सुरेश भुसारी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आपणच खरी शिवसेना असा दावा करणाऱ्या शिंदे गटाने सादर केलेले पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रेच बोगस असून, त्यांची समोरासमोर ओळखपरेड करा. आम्ही यासाठी तयार आहोत, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगापुढे केला. हा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने दि. २० जानेवारीला पुढील युक्तिवाद होईल.
खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यावर आयोगासमोर उद्धव ठाकरे गटातर्फे जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना पक्षावर कोणत्या गटाचा अधिकार, यावर प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. गेल्या आठवड्यात शिंदे गटाकडून खासदार महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला होता. मंगळवारी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ खासदार कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. केवळ प्रतिज्ञापत्राच्या आधारावर कोणत्या पक्षाकडे खरेच किती पदाधिकारी आहेत, हे सांगता येणार नाही.
प्रतिज्ञापत्रातील शिंदे गटाच्या त्रुटी व इतर बाबींबद्दल बोलायला मला पुन्हा काही अवधी देण्यात यावा, अशी मागणी सिब्बल यांनी केली. ती आयोगाने मान्य केली. २० जानेवारीला पुढील युक्तिवाद होणार आहे.
त्वरित निर्णय घेऊ नये: सिब्बल
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी आयोगाने घेतलेला निर्णय त्या प्राप्त परिस्थितीत योग्य होता. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर मूळ शिवसेना पक्ष कुणाचा यावर निर्णय घेणे हे नैसर्गिक न्यायाला व औचित्याला धरून होईल, असे सिब्बल म्हणाले.
शिवसेनेत फूट ही काल्पनिक कथा
शिंदे गटातील सर्व खासदार व आमदार शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेले आहेत. हे चिन्ह त्यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने मिळालेल्या एबी फॉर्ममुळे मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली ही एक काल्पनिक कथा आहे, असे सिब्बल यांनी सांगितले.
...तर आयोगावर नामुष्कीची वेळ
- विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटीसबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे विचारार्थ आहे.
-त्यावर निर्णय येण्यापूर्वीच आयोगाने निर्णय घेतल्यास, आयोगावर नामुष्की ओढावेल, असा दावा सिब्बल यांनी केला.