लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार कोणत्या ना कोणत्या वादात सापडण्याची मालिका सुरूच आहे. गेल्या चार दिवसात एका आमदाराच्या मुलाने बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणे आणि दुसऱ्या आमदारांच्या समर्थकांनी पत्रकाराला केलेल्या मारहाणीची त्यात भर पडली आहे.
मागाठाणे; मुंबई विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने गोरेगावमधील एक व्यावसायिक राजकुमार सिंग यांना मारहाण करत बंदुकीच्या धाकावर कार्यालयातून अपहरण केल्याचा आरोप आहे. तर पाचोरा (जि. जळगाव) येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकारालास शिवीगाळ केली होती. आता त्या पत्रकाराला जबर मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्याला मारहाण करणारे आ. पाटील यांचे समर्थक असल्याचा आरोप त्या पत्रकारानेच केला आहे.
गोळीबाराने सुरुवातnशिंदे गटातील दादर-माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या कथित गोळीबाराचे प्रकरण गाजले होते. nते व त्यांचे माजी नगरसेवक पुत्र समाधान यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. nगोळीबार केला नसल्याचा दावा सरवणकर यांनी केला होता. नंतर त्यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली तरी ते कमालीचे वादात सापडले होते. दादर भागात या घटनेनंतर माेठा तणाव निर्माण झाला हाेता.
संताेष बांगर यांची मारहाण कळमनुरी (जि. हिंगोली) मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी एका महाविद्यालयाच्या प्राचार्याला मारहाण केल्याचे प्रकरण गाजले होते. मंत्रालयात आपल्या समर्थकांसह प्रवेश करताना झालेल्या वादावेळी त्यांनी प्रवेशद्वारावर तैनात पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी ते वादात सापडले होते.
गायकवाडांची अर्वाच्य भाषाबुलढाणा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई असल्याचे विधान केले होते. त्यानंतर मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या एका नेत्याने त्यांना फोन केला असता, त्यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खाते असताना ते विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.