मुंबई : महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी अधिकृतपणे शिवसेना उमेदवारांची घोषणा करणार आहेत. शिंदे गटाचे खा. संजय मंडलिक यांनी याविषयीची माहिती दिली. महायुतीत शिंदे गटाला १३ जागा मिळणार असून, भाजपला ३० तर राष्ट्रवादीच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत. यावर येत्या दोन दिवसांत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. खा. मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर संवाद साधला. तुम्ही काम सुरू ठेवा. तुमच्या सर्वांची उमेदवारी ठरली असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले असून, उद्या उमेदवार जाहीर होतील, असे मंडलिक यांनी स्पष्ट केले.
तीन जागांवर उमेदवार बदलणार?रामटेक : राजू पारवे, वाशिम - यवतमाळ : संजय राठोड, ठाणे : प्रताप सरनाईक, कल्याण - डोंबिवली : श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबई: राहुल शेवाळे, मावळ : श्रीरंग बारणे, कोल्हापूर : संजय मंडलिक, हातकणंगले : धैर्यशील माने, बुलढाणा : प्रतापराव जाधव, शिर्डी : सदाशिव लोखंडे असे १० उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. शिंदे गटाकडून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तीन जागांवर उमेदवार बदलण्याची सूचना भाजपकडून करण्यात आल्याचे समजते.
नाशिकच्या जागेसाठी भाजप आमदार आग्रहीनाशिकचे खा. हेमंत गोडसे यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाेरदार शक्तिप्रदर्शन केले. नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहावी, अशी मागणी केली जात असताना नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नाशिकची जागा भाजपलाच मिळावी यासाठी फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत आग्रह धरण्यात आला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल अहिरे तर भाजपचे नेते दिनकर पाटील, केदार आहेर उपस्थित होते.
ठाकरे गटाचेही पंधरा उमेदवार जाहीर होणारशिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पहिल्या १५ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर होणार आहे, असे सांगतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मविआसोबत नसले तरी आम्ही जिंकू. ते आमच्याबरोबर आले तर विजय देदीप्यमान होईल, असे ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणाले.