मुंबई - महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना गडचिरोलीचे मुख्यमंत्रिपद सांभाळणारे तत्कालिन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली असताना त्यांची सुरक्षा वाढवण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला होता, असा दावा करत शिंदे गटात दाखल झालेले आमदार सुहास कांदे यांनी केला होता. सुहास कांदे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शिंदे गटात गेलेले ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी सुहास कांदे यांनी केलेल्या दाव्याला दुजोरा दिला आहे.
दादा भुसे म्हणाले की, राज्यातील सर्व शिवसैनिकांना सांगू इच्छितो की, कॅबिनेटमध्येही हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्या कॅबिनेटला मीसुद्धा उपस्थित होतो. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून काम केले.नक्षलवाद्यांना प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले. मात्र जे नक्षलवादी प्रवाहाबाहेर राहून नागरिकांचा छळ करण्याचे, त्रास देण्याचे काम करताहेत त्यांच्यावर कठोर कारवाई, कडक शासन करण्यासाठीची मोहीम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात राबवली गेली.
नक्षली संघटनांनी एकनाथ शिंदेंबाबत काही गंभीर निर्णय घेतले होते. याबाबत कॅबिनेटमध्येही चर्चा झाली. तसेच एकनाथ शिंदेंना मोठ्या प्रमाणात सुरक्षा द्यावी, अशी चर्चा कॅबिनेटमध्ये झाली होती. मीसुद्धा त्या कॅबिनेटमध्ये होतो. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना वाढीव सुरक्षा देऊ नका म्हणून सांगितले, असा दावा दादा भुसे यांनी केला.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशी सूचना दिली होती, असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला होता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. तेव्हा नक्षलवाद्यांनी मारण्याची धमकी दिली. त्यांना मारण्यासाठी ते ठाण्यात आणि मुंबईत आले होते. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली. हिंदुत्वविरोधकांना सुरक्षा दिली. मात्र हिंदुत्ववाद्यांना का सुरक्षा देण्यात आली नाही. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असा फोन वर्षा बंगल्यावरून शंभूराजे देसाई यांना फोन करण्यात आला होता. एकनाथ शिंदेंना सुरक्षा का देण्यात आली नाही, असा प्रश्न मला पडला आहे, असे सुहास कांदे म्हणाले होते.