मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याची लाटच आली. राहुल राजीनाम्यावर ठाम असल्यामुळे नव्या अध्यक्षासाठी चाचपणी सुरू झाली. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुशीलकुमार शिंदे यांचे नाव चर्चेत आले आहेत.
एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा अद्याप पक्षश्रेष्ठींनी मान्य केला नाही. त्याचवेळी शिंदे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सुशीलकुमार शिंदे यांना अध्यक्षपदाची संधी दिल्यास अडचणीत असलेल्या काँग्रेसकडून शिंदेंचे एकप्रकारे पुनर्वसनच होणार आहे. मात्र त्यांच्या पुनर्वसनाने राज्यात काँग्रेस उभारी घेणार का, असा प्रश्नही काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.
सुशीलकुमार शिंदे यांना २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून पराभवाला सामोरे जावे लागले. तर शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या देखील गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयासाठी संघर्ष करताना दिसल्या. खुद्द सोलापुरात शिंदे यांना काँग्रेसचे वर्चस्व राखण्यात यश आले नाही. भाजपचे संघटन आणि वंचितचे आव्हान भेदण्यात शिंदे यांना यश आले नाही.
दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. काँग्रेससमोर भाजप आणि शिवसेनेप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीचे तुल्यबळ आव्हान उभे ठाकले आहे. लोकसभा निवडणुकीत 'वंचित'मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. किंबहुना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची काँग्रेसला थोडक्यात हुलकावणी मिळाली. शिंदे यांच्या पुनर्वसनामुळे वंचितशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसला सोपं जाईल अशी शक्यता आहे. मात्र काँग्रेसपासून दुरावत चाललेल्या मुस्लीम मतदारांना परत कसं आणायचं यावर शिंदे यांना काम करावे लागेल.
दुसरीकडे विरोधकांशी लढत असताना पक्ष संघटनेवर देखील शिंदे यांना भर द्यावा लागणार आहे. २०१४ पासून अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. त्याचा परिणाम सहाजिकच पक्षावर झाला आहे. यातून मार्ग काढत काँग्रेसला शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी मजबूत होत असल्याचे चित्र असून यावर देखील शिंदे यांना काम करावे लागणार आहे. तर राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने देशातील काँग्रेस संघटनावर शिंदे यांना लक्ष ठेवावे लागेल. एकूणच शिंदे यांचे पुनर्वसन झाले तरी त्यातून काँग्रेसला राज्यात उभारी मिळणार का, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.