मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढविणार, तर ४८ जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला देणार, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यात दम नाही. फक्त ४८ जागा लढविण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का, असा संतप्त सवाल शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.भाजपच्या मुंबई जिल्हा प्रसिद्धिप्रमुखांच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपासंदर्भात विधान केले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटातील आमदार भडकले आहेत. तर दुसरीकडे बावनकुळे यांनीही वक्तव्यावर सारवासारव केली आहे.
बावनकुळेंनी अधिकारात जेवढे आहे तेवढेच बोलावे : संजय शिरसाटअशा वक्तव्यांमुळे युतीत बेबनाव होतो, याची जाणीव बावनकुळे यांनी ठेवायला हवी. फक्त ४८ जागा लढविण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? यासाठी वरिष्ठ पातळीवरील बैठकीत निर्णय घेतला जाईल. बावनकुळे यांनी अतिउत्साहाच्या भरात विधान केले. त्यामुळे आपल्या अधिकारात जेवढे आहे तेवढच बोलले पाहिजे, असा टोला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी लगावला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप २८८ जागा लढविणार असून शिंदे गटाचे नामोनिशाण शिल्लक राहणार नाही, असे म्हणत शिंदे गटात हवा भरण्याचे काम केले आहे.विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्ष आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर एकटा भाजपच असेल. अंदाज घेऊन शिंदे गटासाठी ते केवळ ५ ते ६ जागा सोडतील. उर्वरित जागा भाजपच्या चिन्हावरच लढविल्या जातील, असेही जयंत पाटील म्हणाले.
आता सारवासारव बावनकुळे यांचा बैठकीतील व्हायरल व्हिडीओ डिलीट करण्यात आला. निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असे वक्तव्य केले. प्रत्यक्षात निवडणुकीच्या वेळीच जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या तयारीचा उपयोग होईल, अशी सारवासारव बावनकुळे यांनी केली.
१३० ते १४० जागा लढविणार : गायकवाडशिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी १३० ते १४० जागा लढविणार आहोत. आमच्यापेक्षा भाजप मोठा पक्ष असल्याने निश्चितपणे जास्त जागा लढेल. पण, आम्ही शिवसेना म्हणून १२५ पेक्षा कमी जागा लढणार नाही. पक्षश्रेष्ठींनी बावनकुळे यांना समज द्यावी, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.