मुख्यमंत्रिपदावर दावा भक्कम करणारी शिंदे यांची खेळी! इकडे अजित दादा तर तिकडे शरद पवार-शिंदेंच्या भेटीने ठाकरे अस्वस्थ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 08:17 AM2024-08-09T08:17:17+5:302024-08-09T08:20:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्ष २००४ मध्ये सर्वाधिक आमदार विजयी होऊनही मुख्यमंत्रिपदावरील दावा शरद पवार यांनी सोडला याबद्दल अजित पवार यांनी यापूर्वी दोनवेळा जाहीर नाराजी प्रकट केली. 

Shinde's move to strengthen his claim on the post of Chief Minister! Thackeray is upset by the meeting of Ajit Dada here and Sharad Pawar-Shinde there  | मुख्यमंत्रिपदावर दावा भक्कम करणारी शिंदे यांची खेळी! इकडे अजित दादा तर तिकडे शरद पवार-शिंदेंच्या भेटीने ठाकरे अस्वस्थ 

मुख्यमंत्रिपदावर दावा भक्कम करणारी शिंदे यांची खेळी! इकडे अजित दादा तर तिकडे शरद पवार-शिंदेंच्या भेटीने ठाकरे अस्वस्थ 

ठाणे : राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद हा संघर्षाचा मुद्दा ठरणार, याचेच संकेत बुधवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ग्रंथाच्या प्रकाशन समारंभच्या सोहळ्यातून मिळाले. राजकारणातील दीर्घ अनुभवी अजित पवार व मुत्सद्दी देवेंद्र फडणवीस या दोन मातब्बर नेत्यांना मागे टाकून मुख्यमंत्रिपद प्राप्त केलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने केलेली खेळी यशस्वी झाल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्ष २००४ मध्ये सर्वाधिक आमदार विजयी होऊनही मुख्यमंत्रिपदावरील दावा शरद पवार यांनी सोडला याबद्दल अजित पवार यांनी यापूर्वी दोनवेळा जाहीर नाराजी प्रकट केली. 

अजित पवार यांना महायुतीत सोबत घेण्याबाबत रा. स्व. संघ परिवाराने जाहीर नाराजी प्रकट केली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे निवडणुकीनंतर महायुतीमधील स्थान काय, याबाबत साशंकता आहे. अशा अस्थिर वातावरणात पवार यांनी शिंदे यांच्यापेक्षा आपल्या असलेल्या अनुभवाचा व क्षमतांचा भाजपला अधिक उपयोग होऊ शकतो हेच जाहीरपणे ठसवण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांच्यासोबत असलेले अनेक आमदार, मंत्री हे मूळचे आपले सहकारी असल्याचेही खुबीने सांगण्यास पवार विसरले नाहीत. 
गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री शिंदे व शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या मुद्यावरून शरद पवार यांना मोठेपणा देऊन महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. धारावी प्रकल्प अदानी उद्योगाला देण्यास उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांना जोडणारा समान धागा हा अदानी यांच्याशी उभयतांची असलेली जवळीक हाच आहे. शिंदे-पवार भेटीत अदानी कंपनीचे अधिकारी उपस्थित असल्याने ठाकरे अस्वस्थ झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर धारावीच्या मुद्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी टाकण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असू शकतो. फडणवीस यांना बाजूला ठेवून शिंदे यांच्या माध्यमातून पवार यांच्याशी संवाद वाढवण्याची ही भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची खेळी शिंदे यांचे महायुतीमधील महत्त्व वाढवणारी आहे. फडणवीस दिल्लीत जाणार अशा वावड्या उठत असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे हे आपला भविष्यातील मुख्यमंत्रिपदाचा दावा भक्कम करू पाहत आहेत, असेच संकेत प्राप्त होत आहेत.

- बुधवारच्या सोहळ्यात आपल्याला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर आपण केवळ आमदारच नव्हे, तर पक्ष सोबत घेऊन आलो असतो, असे सांगत पवार यांनी शिंदेंपेक्षा आपला पर्याय भाजपने निवडायला हवा होता, असे फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे सुनावले. 
- अर्थात शिंदे यांनी सत्ताधारी बाजू सोडून विरोधकांसोबत येऊन सरकार बनवण्याची जोखीम पत्करली, असे सांगत फडणवीस यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्रिपदाचा पहाटेचा शपथविधी करून पुन्हा शरद पवार यांच्याकडे माघारी गेलेल्या पवार यांना त्यांच्या त्या बेभरोसे कृतीची अप्रत्यक्ष आठवण करून दिली. 

Web Title: Shinde's move to strengthen his claim on the post of Chief Minister! Thackeray is upset by the meeting of Ajit Dada here and Sharad Pawar-Shinde there 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.