मुंबई - महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड आणि त्याला शिवसेनेतील ४० च्या आसपास आमदारांनी दिलेला पाठिंबा यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल आहे. तसेच या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. तसेच आमदारांपाठोपाठ खासदारांचा मोठा गटही एकनाथ शिंदे यांच्या मागे गेल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड तसेच या बंडाला आमदार आणि खासदारांनी दिलेला पाठिंबा याबाबत उद्धव ठाकरे अद्याप स्पष्टपणे काहीही बोललेले नाहीत. मात्र आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेलं बंड, शिवसेनेमध्ये पडलेली फूट, दोन गटांमुळे पक्षासमोर उभा राहिलेला अस्तित्वाचा प्रश्न याबाबत उद्धव ठाकरे आता रोखठोक बोलणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रश्नांना उत्तरं देणारी मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी दैनिक सामनामधून प्रकाशित होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे कोणते विचार मांडतात. पक्षात झालेल्या बंडखोरीबाबत काय बोलतात. महाविकास आघाडीबाबत, हिंदुत्वाबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच फुटीर गटाने तुम्हाला एक विनंती केली आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला असता, बोला... मी मान्य करतो, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिल्याने आता उद्धव ठाकरे बंडखोरांची कोणती मागणी मान्य करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. तसेच या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.