यदु जोशी -मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढविण्याचा निर्णय घेत ते महायुतीला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज यांच्याशी विविध विषयांवर केवळ चर्चाच केली नाही तर त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देत निर्णयही घेतले. राज ठाकरे यांनी अलीकडेच मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना कोणत्याही परिस्थितीत मी यावेळी मनसेला सत्तेत बसविणार असे जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीत राज यांनी नरेंद्र मोदी यांना आणि पर्यायाने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. काही उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी सभादेखील घेतल्या होत्या. भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी घेतेलल्या सभेचा त्यात समावेश होता.मात्र, विधानसभा निवडणुकीला तीन महिने शिल्लक असताना राज यांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी एक सर्वेक्षण पूर्ण केले आणि दुसरे सर्वेक्षण ते आता सुरू करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात उमेदवार लढविण्याची रणनीती ते आखत आहेत. त्यांच्या उमेदवारांचा महायुतीला फायदा होईल की नुकसान याबद्दल मतमतांतरे असली तरी उद्धव ठाकरेंची मते आपल्याकडे वळविण्यात राज यांना जितके यश येईल, तितका महायुतीला फायदाच होईल, असे म्हटले जात आहे.
वर्षा निवासस्थानी विविध मागण्यांवर चर्चाराज ठाकरे यांच्याबद्दल काही विधाने केल्यामुळे अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांची कार मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात फोडली होती. त्यावरून अजित पवार गट विरुद्ध मनसे असे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरेंना प्रतिसाद देत वर्षा निवासस्थानी शनिवारी सकाळी विविध मागण्यांवर चर्चा केली आणि मुंबईतील प्रश्नांसह पुण्याचे प्रश्न आणि बीएएमएस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही निर्णय घेतले. महायुतीतील एका घटक पक्ष (अजित पवार गट) आणि मनसे यांच्यात तणाव निर्माण झाला असताना शिंदे यांनी मात्र राज यांच्याशी चर्चाच केली नाही, तर काही निर्णयही त्यांच्या मागण्यांवर घेतले. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी रेल्वेशी संबंधित मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी बैठकीतूनच विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना फोन लावला. बोदवड (जि.जळगाव) येथील पंतप्रधान आवास योजना रखडल्याचे मनसेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी निदर्शनास आणून देताच ‘अडथळे लगेच दूर करा’ असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
समस्यांची घेतली दखल- मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. तिथे आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत.- अशावेेळी वरळी बीडीडी चाळीच्या, तसेच पोलिसांच्या घरांच्या प्रश्नांबाबत आणि एसआरए प्रकल्पांविषयीच्या समस्यांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली.- एसआरएबाबत संबंधित विकासकावर कारवाई करा, असेही निर्देश दिले. राज यांच्यासोबतच्या बैठकीवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिंदे यांनी बोलावून घेतले होते.