शिवाजी सुरवसे/ ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 4 - गरीब परिस्थिती तसेच प्रतिकूल भौगोलिक वातावरणात वाढलेले आाणि देशाच्या विविध पदावंर पोहोचलेल्या सुशीलकुमार शिंदे यांची संघर्षमय जीवनगाथा देशासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले.माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर गौरव करण्यात आला, त्यावेळी राष्ट्रपती बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी़ विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. शरद पवार, खा. पी़ चिदंबरम, बिहारचे माजी राज्यपाल आणि सुशीलकुमार शिंदे अमृतमहोत्सवी समितीचे अध्यक्ष डी़. वाय.पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण, उज्वलाताई शिंदे, खा़ ज्योतीरादित्य सिंधिया, खा़ कुमारी शैलजा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़कार्यक्रमस्थळी राष्ट्रपतींचे सव्वा तीन वाजता आगमन झाले़ आपल्या १० मिनिटाच्या भाषणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिंदे यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला़ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असल्यापासून मी सुशीलकुमार शिंदे यांना ओळखतो़ विशेषत: अर्थमंत्री असताना अनेक विषयावर त्यांच्याशी चर्चा झाली़.भारत स्वातंत्र्यानंतर मागासलेपण, निरक्षरता, अनारोग्य आणि अज्ञानातून बाहेर पडला़ भारतीय लोकशाहीचे हे चकचकित यश आहे़ आपण हे यश ताकदीने साजरे करुयात़ .संघर्षमय जीवनातून शिंदे यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री तसेच लोकसभेचे नेते आदी विविध पदे भूषविली़ हा त्यांच्या शांत, संयमी, धाडसी आणि कटू स्वभाव दर्शवितो़ त्यांची कथा प्रत्येक भारतीयाची कथत आहे़ भारतामधील लाखो लोकांचे सुशीलकुमार शिंदे हे प्रेरणास्त्रोत आहेत़ प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो त्याप्रमाणे उज्वला ताई यांचा शिंदे यांच्या यशस्वी जीवनात मोठा वाटा असल्याचे राष्ट्रपती म्हणाले़ अनेक मान्यवर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आले आहेत ही साधी गोष्ट नाही, ते निश्चित शंभरावा वाढदिवस साजरा करतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला़ यावेळी राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी शिंदेच्या कामाचे कौतुक केले़ राज्याला आणि देशाला दृष्टी देणारा नेता असा त्यांनी उल्लेख केला़ बहुभाषिक आणि विविध जाती धर्माच्या संस्कृतीने नटलेल्या सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांचा जन्मशताब्दी वाढदिवस साजरा होईल आणि मी पण येईल असे ते म्हणाले़ प्रारंभी डी़वाय़ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले़शिंदे पवारांच्या मदतीने राजकारणात आले, त्यांच्यातील अहंकाराला त्यांनी मारले आहे त्यामुळे ते देशाचे नेते झाले मला राज्यपाल करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता असेही पाटील म्हणाले़ राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाले़ प्रदीप भिडे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले तर काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी उपस्थितांचे आभार मानले़ उषा फेणानी यांनी तयार केलेले शिंदे यांचे पेटींग्ज गायिका पद्मजा फेणाणी शिंदे यांना भेट दिले़ आ़ प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रपतीचा सत्कार केला़ सुधीर खरटमल आणि प्रकाश यलगुलवार यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले़ शिंदेंचा प्रवास प्रेरणादायी-मुख्यमंत्रीसुशीलकुमार शिंदे यांनी संघर्षातून इतिहास उभा केला आहे़ एक व्यक्ती स्वत:च्या मेहनतीवर किती मोठा होऊ शकतो यांचे शिंदे हे उदाहरण आहे़ ढोर गल्ली ते दिल्लीपर्यंत त्यांनी मार्गक्रमण केले़ त्यांचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले़ त्यांनी सातत्याने विषय परिस्थितीमध्ये लढा दिला़ ते मनाने आणि पदाने मोठे आहेत़ सकारात्मकता ही त्यांच्या चेहऱ्यावरच दिसते़ त्यांनी विविध पदांना न्याय देत आपला ठसा उमटविला़ शिंदे हे एक देशाचे मात्तबर नेते आहेत़ ७५ वा वाढदिवस म्हणजे थांबण्यासाठी नाही तर नवीन प्रेरणा देण्यासाठी आहे.पवार म्हणाले आपण दोघेही आता थांबण्याची गरजपवार यांनी आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा धांडोळा घेतला़ ७५ पैकी तब्बल ५० वर्षे ते समाकारणात आहेत़ त्यांचा जीवनाचा खडतर प्रवास कष्टकरी तरुणांना आदर्शवत असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले़ शिंदे हे व्यक्तीमत्त्व साधे नाही हे दिसले होते म्हणूनच त्यांना करमाळ्यातून उभा करण्याच्या निर्णय घेतला़ त्यावेळी मी सोलापूरचा पालकमंत्री होतो़ पोलिस खात्यातील नोकरीचा शिंदेंनी राजीनामा शिंदे यांनी दिला आम्ही त्यांना तिकीट द्यायचे ठरविले मात्र दिल्लीमध्ये अचानक त्यांचे तिकीट कापले त्यामुळे दिल्लीत कधी काय होईल सांगता येत नाही ही खूप गंम्मत नगरी आहे असे शरद पवार म्हणाले़ अनेक कठिण परिस्थितीमध्ये शिंदे खचले नाहीत़ विविध पदांवर त्यांनी चांगले काम करुन ठसा उमटविला़ सोलापूरचे कर्तृत्त्व त्यांनी दाखवून दिले़ शिंदे साहेब आत्ता आपण दोघांनी जरा जपूऩ आत्ता आपण इकडे तिकडे बघायचे नाहीत आत्ता आपला निकाल लागला आहे असे पवार म्हणतात उपस्थितांमध्ये हंशा पिकला़सोलापूरकरांनी मला तळहातीवरील फोडाप्रमाणे जपले-सुशीलकुमार शिंदेसुशीलकुमार शिंदे यांनी आजवरच्या आपल्या जीवनाची भावनिक होऊन वाटचाल सांगितली़ सोलापूर करांनी मला तळ हातावरील फोडाप्रमाणे जपले़ एक सोलापुरातील गरीब कुटूंबात जन्मलेला मुलगा एवढ्या मोठ्या पदांपर्यंत जाऊ शकतो हे माझं उदाहरण आहे़मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर मला प्रणव मुखर्जी यांनी बसविले़ उपराष्ट्रपती पदासाठी पडणार आहे हे माहित असताना मी निवडणूक लढलो कारण मी पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता असल्याचे सुशीलकुमार शिंदे म्हणाले़