मुंबई - एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला विरोध आणि हिंदुत्वाचं कारण देत पक्षनेतृत्वाविरोधात बंड पुकारले होते. त्या बंडाला शिवसेनेतील ४० आमदारांनी पाठिंबा दिला होता. या ४० आमदारांसोबतच उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद दिलेले काही अपक्ष आमदारही बंडाला पाठिंबा देत एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. दरम्यान, नेवासामधील आमदार शंकरराव गडाख यांनी मात्र उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती. एकनाथ शिंदेंसोबत जावं की उद्धव ठाकरेंसोबत निष्ठा कायम ठेवावी, या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या गडाख यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली असून, आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना शंकरराव गडाख यांनी सांगितले की, आमदार नाराज होते, ही वस्तुस्थिती आहे. काही राजकीय नाराजी असेल, काही कामाबाबतची नाराजी असेल, उद्धव ठाकरे यांनी त्या त्या वेळी बैठका घेतला, आमच्या माध्यमातून काम करून देण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्या आमदारांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, मात्र मी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे काय करावं, हा त्या आमदारांचा विषय आहे, असेही गडाख यांनी सांगितले.
आमदारांमध्ये नाराजी होती याची कल्पना उद्धव ठाकरेंनाही असावी. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात नाराजी आणि त्यातून एवढा मोठा स्फोट होईल, याची कल्पनाही अपेक्षा आम्हाला नव्हती आणि उद्धव ठाकरे यांनाही ती नसावी. शिंदे गटाकडून माझ्याशी सध्यातरी संपर्क झालेला नाही. मात्र मी मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो, असे शंकरराव गडाख यांनी सांगितले.
शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी विजयी झाल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान, शिवसेनेत मोठे बंड झाल्यानंतर शंकरराव गडाख नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.