शिर्डी / अक्कलकोट : गुरुपौर्णिमेची पर्वणी साधत लाखो भाविक शुक्रवारी शिर्डीत साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले़ या वेळी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश विनय जोशी व त्यांच्या पत्नी रेवती जोशी यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली़ तसेच ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’च्या जयघोषात लाखो भाविकांनी अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.शुक्रवारी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीत श्री साईसच्चरित्र पारायणाची समाप्ती झाली़ यानिमित्ताने साईबाबांच्या प्रतिमेची व पोथीची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली़ या वेळी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते़ शनिवारी गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता होणार आहे़ सकाळी गुरुस्थान मंदिरात रूद्राभिषेक, गोपाळकाला, कीर्तन व दहीहंडी होईल़ तसेच रात्री भोपाळ येथील सुमित पोंदा यांचा श्री साई अमृतकथा हा कार्यक्रम होणार आहे.अक्कलकोटमध्ये शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता काकडारती झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजता स्वामी महाराजांना नैवेद्य दाखविण्यात आला. गाणगापूर रस्त्यावरील भक्त निवासात भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. दुपारी चारपर्यंत महाप्रसाद सुरू होता. दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच मुख्य मंदिरापासून ते फत्तेसिंह चौकापर्यंत भाविकांची रांग लागली होती.
शिर्डी, अक्कलकोट दुमदुमले!
By admin | Published: August 01, 2015 12:54 AM