ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. २२ - काही महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झालेल्या प्रेमीयुगलाने शिर्डीत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. कैलास गाढवे (वय २५)असे मृत तरूणाचे नाव असून तो इगतपुरीचा तर कोमल कदम (वय २०) ही तरूणी रायगडची असल्याचे समजते. कैलास व कोमल या दोघांची फेसबूकच्या माध्यमातून झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे, ते दोघेही गेल्या १ मार्च पासून घरून बेपत्ता होते.
काल, २१ मार्च रोजी येथील हेडगेवार नगर मधील हॉटेल हरजीवन येथे या युगलाने विष प्राशन केल्याचे पोलीसना रात्री साडेनऊ वाजता कळवण्यात आले, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व उपनिरीक्षक कहाळे तातडीने घटना स्थळी दाखल झाले व त्यांनी या दोघांना साईबाबा रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी कोमल मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर रात्री दोन नंतर कैलासनेही या जगाचा निरोप घेतला, मृत्यूपूर्वी या प्रेमी युगलाने कॉमन सुसाईड नोट लिहिली असून त्यात आम्ही आमच्या मर्जीने आत्महत्या करत असून यास कुणालाही जबाबदार धरू नये असे सांगत आम्ही माफीला लायक नाही अशी खंतही व्यक्तही केली आहे, या सुसाईड नोट वर दोघांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.