मुंबई : देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत शिर्डीचा समावेश करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तशी परवानगी दिली असून, यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत दररोज हजारो नागरिक दाखल होत असतात. त्यांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिर्डीत विमानतळ उभारण्यात आले. २ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे उद्घाटन केले होते. हे विमानतळ सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळू लागला. गेल्या तीन वर्षांत येथून तब्बल ९ लाखांहून अधिक प्रवाशांनी ये-जा केली आहे.प्रवाशांचा प्रतिसाद पाहता शिर्डीचा प्रमुख विमानतळांच्या यादीत समावेश करण्याची मागणी होत होती. अखेर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ‘विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण कायदा २००८’अंतर्गत शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळ म्हणून घोषित केले आहे. या कायद्याच्या कलम १३ नुसार विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाला प्रमुख विमानतळांवर पुरवल्या जाणाऱ्या वैमानिक सेवांचे दर निश्चित करणे बंधनकारक आहे. यात विमानतळ विकास शुल्क, विमान अधिनियम १९३४ आणि विमानतळ कायदा १९३७ (नियम ८८) अंतर्गत आकारण्यात येणाऱ्या प्रवासी सेवा शुल्काचा समावेश आहे.दरम्यान, शिर्डीला प्रमुख विमानतळांच्या यादीत स्थान मिळावे म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला यश मिळाले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला याचा मोठा फायदा होईल. शिवाय प्रवाशांना अधिक चांगली सुविधा देता येईल, अशी प्रतिक्रिया ‘एमएडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली.उड्डाणसंख्या होणार दुप्पटमहाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळ विकसित केले आहे. सध्या चेन्नई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, मुंबईहून या मार्गावर दररोज ६ विमाने ये-जा करतात. लवकरच ही संख्या दुप्पट होणार आहे. तसेच नाइट लँडिंगचे कामही पूर्ण झाले असून, हवामान विभागाच्या परवानगीनंतर ही सुविधा सुरू केली जाईल.
शिर्डी देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 6:16 AM