शिर्डी, दि. २६ - जगभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या शिर्डी विमानतळावर आज पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यासाठी एअर इंडियाचे 72 सिटचे विमान मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावरून दुपारी 4 वाजून वीस मिनिटांनी-शिर्डीच्या दिशेने झेपावले. अवघ्या चाळीस मिनिटात 5 वाजून 2 मिनिटांनी या विमानाची चाके नव्याने उभारलेल्या शिर्डी विमानतळाच्या भूमीवर विसावली.या चाचणी विमान प्रवासाचा पहिला प्रवासी होण्याचा मान जिल्ह्याचे पालक मंत्री राम शिंदे यांना मिळाला. त्यांच्या बरोबर विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी यांच्यासह हवाई वाहतूक विभागाचे अधिकारी व सुरक्षा अधिकारी यांचा समावेश होता. यावेळी विमानतळावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संस्थानचे उपाध्यक् चंद्रशेखर कदम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष ममता पिपाडा, माजी विश्वस्त सचिन तांबे, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, शिर्डी विमानतळाचे संचालक धिरेन भोसले आदींसह शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यानंतर विमानतळावर राष्ट्रपती यांच्या दौऱ्याची आढावा बैठक घेण्यात आली. येत्या 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचा भक्तार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
शिर्डी विमानतळावर पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी, १ ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते होणार भक्तार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 6:04 PM