शिरूर - सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. त्यातच उमेदवारही गावोगावी, घरोदारी जात लोकांना मते मागत आहेत. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारावेळी एक प्रसंग घडला, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
कोल्हे निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारसंघातील हिवरे कुंभार गावात गेले होते. त्याठिकाणी कोल्हेंचं भाषण संपताच एक वयोवृद्ध आजोबा त्यांच्याजवळ गेले. किसन तांबे असं त्यांचं नाव होतं. त्याठिकाणी आजोबांनी हातात माईक घेतला आणि गेल्या निवडणुकीची कोल्हेंना आठवण करून दिली. ते म्हणाले की, मागच्या निवडणुकीत बांदलसाहेब होते, तेव्हा तुम्हाला मी ११०० रुपये दिले होते. आता पुन्हा ११०० रुपये देणार, तुम्ही या निवडणुकीत निवडून येणार आहे. हा माझा शब्द आहे. कुणाचा पैसा खाणार नाही, कुणाचा रुपया घेणार नाही असं म्हणत तांबे यांनी त्यांच्या खिशातले पैसे काढून कोल्हे यांना दिले.
त्यानंतर कोल्हे यांनीही आजोबांच्या हातातील पैसे घेत त्यांना नमस्कार करत पाया पडले. तेव्हा तुम्ही १०० टक्के निवडून येणार आहात. माझी सून नारायण गावची असून तुम्ही माझ्या सुनेचे भाऊ लागता असं सांगत किसन तांबे यांनी अमोल कोल्हे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या ११०० रुपयांची आणि आजोबा-अमोल कोल्हे यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीकडून शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. मात्र यंदाची निवडणूक वेगळी आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तुतारी चिन्ह घेऊन कोल्हे रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे शिवाजी आढळराव पाटील यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत.
पाहा व्हिडिओ