काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 08:06 AM2024-05-01T08:06:20+5:302024-05-01T09:25:28+5:30
loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित ३ टप्प्यांसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी राज्यात येत ६ सभा घेतल्या. त्यात शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले. त्यावरून पवारांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.
पुणे - Sharad Pawar on BJP ( Marathi News ) आम्ही लोक देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत आहोत. मोदी माझ्याबद्दल म्हणतात, हा आत्मा तडफडत फिरत आहे. ठीक आहे, लोकांचे दुःख बघून तडफडतो त्याची मला काही चिंता नाही. काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण आम्ही कधी लाचार बनणार नाही. महाराष्ट्र कधी लाचार बनू शकत नाही. महाराष्ट्र कधी स्वाभिमानाशी तडजोड करू शकत नाही असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला दिला.
शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत पवार बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, भाजपानं एवढं फोडाफोडीचं राजकारण केलं. घरातली माणसं फोडली, सहकारी फोडले. अनेकांना अनेक वर्षे काम करण्याची संधी ज्यांना दिली त्या लोकांना फोडलं आणि एक वेगळं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न आज भाजपावाले करत आहेत हे राज्याच्या हिताचे नाही. जे हिताचं नाही त्यांना खड्यासारखं बाजूला टाकणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच पंतप्रधान पद हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं. ते देशाचं पद असतं, त्याची प्रतिष्ठा ठेवायची असते, ती प्रतिष्ठा ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण तयार आहोत. पण त्या पदावर बसलेली व्यक्ती खोट्या गोष्टी सांगत असेल. चुकीच्या गोष्टी मांडत असेल, चुकीच्या टिका-टिप्पणी करत असतील आणि देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता वापरायची असते याचा त्यांना विसर पडत असेल तर अशांच्या हातातून सत्ता काढणं हा निकाल तुम्हाला आणि मला घ्यावा लागेल. महाराष्ट्रातील सगळी शक्ती एकत्रित करून देशाच्या राजकारणामध्ये बदल करण्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे, हा निकाल आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे असं आवाहनही शरद पवारांनी केले.
दरम्यान, माझा आत्मा अस्वस्थ आहे, खरंय, तो अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुखणं मांडायचं असेल तर त्यासाठी काय करावं या विचाराने हा आत्मा अस्वस्थ आहे. आज सबंध देशामध्ये सामान्य लोक महागाईने अडचणीत आली, आणि लोकांना संसार प्रपंच करणं अवघड झालं आहे. त्यासंबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली, तर १०० वेळा ही अस्वस्थता दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. कारण अडचणीतल्या माणसाचं दुखणं हे मांडणं आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम केलं पाहिजे, हे संस्कार माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांनी केलेत, आणि त्याच्याशी आम्ही कधी तडजोड करणार नाही असंही पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.