Sharad Pawar vs PM Modi, Shirur: सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत आहे. लोकशाहीत दिलेलं मत त्यांना सहन होत नाही. ही वाटचाल हुकूमशाहीकडे आहे. लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूर येथील जाहीर सभेत मोदी सरकारवर टीका केली. "नरेंद्र मोदी हे एखाद्या समाजाचे पंतप्रधान नसून, ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्य करून ते गैरसमज पसरवित आहेत. त्यामुळे देशाच्या ऐक्याला हे घातक आहे. जे देशाच्या हिताचे नाही, ज्या लोकशाहीवर विचारधारेचा विश्वास नाही, अशा विचारसरणीबरोबर मी आणि उद्धव ठाकरे कदापि सोबत जाणार नाही, आम्ही तुम्हाला सत्तेतून बाहेर काढू," असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, "महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची विचारधारा ही देशाला एकत्र ठेवणारी, ऐक्याची आहे. त्या विचारानेच आपल्याला पुढे जावे लागेल. मोदी यांची नुकत्याच झालेल्या काही जाहीर सभांमधील भाषणातून समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लोकसभा निवडणुकीचे पहिले तीन टप्पे झाले आहेत. त्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होत आहेत. त्यामुळे मोदी अस्वस्थ झाले असावेत. त्यातूनच ती अशी वक्तव्य करीत असावीत."
"सत्तेचा गैरवापर करणे ही त्यांची खासियत लोकशाहीत दिलेलं मत त्यांना सहन होत नाही. अरविंद केजरीवाल यांची सुटका न्यायालयाने केली त्याचा मला आनंद अनिल देशमुख, संजय राऊत यांना तुरुंगात टाकले, पत्रकारांना तुरुंगात टाकायचं? गृहमंत्री यांना तुरुंगात टाकायचं? ही वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. इंग्रजांना घालवण्यासाठी कोट्यवधी लोक एकत्र आले आणि त्यांना घालवले, तर मोदी काय चीज, राहुल गांधी यांनी दौरा केला त्याचा अभिमान वाटला पाहिजे तर मोदी त्यांना शहाजादे म्हणतात. त्यांच्या धोरणावर टीका करा, भाषणावर टीका करा, पण त्यांच्यावर वैयक्तिक टीका का करता? त्यांच्या वडिलांनी देशासाठी प्राण दिले, इंदिरा गांधींनी देशासाठी योगदान दिले. नेहरू जेलमध्ये राहिले त्यांच्यावर टीका करतात," असेही शरद पवार म्हणाले.
"मी मोदींचे वक्तव्य मुस्लीम समाजाबाबत ऐकलं. हा देश एकसंघ ठेवायचा असेल, तर सर्वांना एकत्रित घेऊन देश पुढे न्यावा लागेल. एका समाजाबाबत आपण वेगळं मत मांडलं तर ऐक्य राहणार नाही. मोदींची अलीकडची वक्तव्ये ही समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. तिथे मी आणि आमचे सहकारी असणार नाहीत," असेही शरद पवारांनी सांगितले.