आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरहीछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. तसेच सोशल मीडियात त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टीही शेअर केल्या जात आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी कमीत कमी काळात असे काही कार्य केले ज्यामुळे मराठ्यांचा एकच डंका देशभरात वाजत होता. मुस्लिम शासकांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते.
महाराजांनी केवळ लढाया करून स्वराज्याची निर्मिती केली इतकेच नाही तर त्यांनी अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. त्यांनी महिलांना सन्मान दिला, त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेतक-यांच्या भल्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या शिवाजी महाराज हे जगभरातील इतर राजांपेक्षा खूप वेगळे आणि सर्वोत्कृष्ट राजा ठरतात. कारण त्याला कारणेही तशीच वेगळी आहेत. ती नेमकी कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील
१) स्वत:च स्वत:चं राज्य निर्माण केलं
शिवाजी महाराज हे जन्माने राजपूत्र नव्हते. जन्मताच त्यांच्या तोंडात चांदीच चमचाही नव्हता. त्यांनी स्वत: त्यांचं मराठी माणसाचं विश्व निर्माण केलं. त्यांनी मुघल, निजाम, आदिलशाही, ब्रिटीशांशी झुंज देऊन स्वत:चं राज्य तयार केलं. त्यांना ह्या गोष्टी पिढीजात मिळालेल्या नाहीयेत. महाराजांनी पहिला किल्ला त्यांच्या वयाच्या १६ वर्षी जिंकला होता. यावरून त्यांचं वेगळेपण दिसून येतं.
२) महाल नाही तर १०० पेक्षा जास्त किल्ले बांधले
इतर राज्यांप्रमाणे शिवाजी महाराजांना ऐशो आरामात राहणे कधीही पसंत नव्हते किंवा त्यांनी ते पसंत केले नाही. त्यांनी स्वत:साठी एकही महाल उभारला नाही. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या जनतेचं रक्षण करता यावं म्हणून १०० पेक्षा जास्त किल्ले उभारले.
३) कर पद्धत बदलली
शिवाजी महाराजांच्या आधी स्थानिक कर्जवसूलदार हे लोकांकडून कोणत्याही नियमाविना टॅक्स गोळा करायचे. कसेही आणि कितीही प्रमाणात लोकांकडून टॅक्स गोळा केला जायचा. पण शिवाजी महाराजांनी ही पद्धत बदलून शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणारा टॅक्स कमी करून टाकला.
४) शेतक-यांना मदत
अनेक लोकांकडे शेती करण्यासाठी स्वत:ची जमीन नव्हती. शिवाजी महाराजांनी सरकारी जमीन या लोकांना देऊन त्यांना शेती करण्यास मदत केली. सोबतच पुणे परिसरात अनेक धरणंही बांधली ज्याचा फायदा शेतीला मोठा झाला.
५) भारतीय नौदलाचे जनक
शिवाजी महाराज हे फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणूनही लोकप्रिय आहेत. इंग्रजांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी शिवाजी महाराजांनी तेव्हा अतिशय दमदार असं आरमार त्यांनी तयार केलं होतं. त्यामाध्यमातूनच त्यांनी अनेकदा ब्रिटीश आणि फ्रेन्च लोकांना धूळ चारली आहे.
६) जनतेच्या कल्याणाचे अनेक कायदे
महाराजांनी त्यांच्या राज्यात अनेक मजबूत कायदे तयार केले. जे सर्वसामान्य माणसाच्या फायद्याचे होते. रयतेला, जनतेला वेठीस धरण्याची त्यांची वृत्ती अजिबात नव्हती. उलट त्यांच्या फायद्याचे अनेक कायदे त्यांनी त्यावेळीच तयार केले होते आणि त्याचे पालनही केले जात होते. स्त्रियांच्या संरक्षणासंबंधी अनेक कायदे तेव्हा त्यांनी केले होते.
७) धर्मनिरपेक्षवादी
शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात धर्मनिरपेक्षतावादी राजा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते. त्यांचे कित्येक अंगरक्षक हे मुस्लिम होते. मुस्लिमांसोबतच इतरही अनेक जातींची लोकं त्यांच्या सैन्यात होती.
अस्पृश्यतेचे निर्मूलन
जावळीच्या मोर्यांचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी भोरप्याच्या डोंगरावर एक किल्ला बांधला आणि त्याचे नाव `प्रतापगड’ ठेवले. तिथे भवानीमातेचे एक मंदिरही बांधण्यात आले. शिवाजी महाराज जेव्हा प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तिथे खालच्या जातीतील काही माणसे दूरवर उभी असलेली पाहिली. त्याविषयी विचारपूस करता त्यांना सांगण्यात आले की ती मूर्ती घडविणारी अस्पृश्य माणसे होती. शिवाजी महाराजांनी त्यांना पूजा करण्यास सांगितले. पुजाऱ्याने यावर आक्षेप घेतला. पण शिवाजी महाराजांनी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ विचारले की जर हे अस्पृश्य मूर्ती घडवू शकतात तर मग तीच मूर्ती त्यांनी पूजा केल्याने अपवित्र कशी होईल?
८) महिलांचा आदर
शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला असा आदेश दिला होता की, लहान मुलांना आणि महिलांना जराही नुकसान पोहचवू नका. शिवाय दुश्मनांच्या एकाही महिलेला इजा केलेली किंवा त्रास दिलेला शिवाजी महाराजांना चालत नव्हतं. सैनिकातील कुणी असे केल्यास ते सैनिकाला कठोर शिक्षा करीत होते. महिलांचा आदर करणे हा त्यांचा आदेश होता.
सतीला प्रतिबंध
काही तज्ञांच्या मते सतीची प्रथा उच्चवर्णीयांमध्ये किंवा स्वतःला उच्चभ्रू म्हणवणाऱ्यांमध्ये जास्त पाळली जाई. म्हणजेच सतीची प्रथा भारतातील बहुजन प्रजेत फारशी प्रचलित नव्हती आणि खालच्या जातीतही खूप कमी प्रमाणात ती अस्तित्वात होती. किमान एका इतिहासकाराच्या माहितीनुसार ही प्रथा नंतरच्या मुघली सत्तेच्या उत्तरार्धात हिंदू राजत्रियांच्या दहनाव्यतिरिक्त विरळाच आढळत असे. जिजाबाई त्यांचे पती शहाजी यांच्या मृत्यूनंतर सती जाऊ इच्छित होत्या परंतु शिवाजी महाराजांनी त्यांना रोखले व आपल्या प्रजेला एक उदाहरण घालून दिले.
९) ते अंधश्रद्धाळू नव्हते
शिवाजी महाराज हे श्रद्धाळू होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. अमावस्येची रात्र ही अपशकून मानली जाते पण त्यांनी कित्येक लढाया अमावसेच्या रात्रीच केल्या आहेत.
१०) गनिमी कावा
गनीमी कावा अथवा इंग्रजीत गुर्हिल्ला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. ज्यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे.