कोल्हापूर: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागलं आहे. या आंदोलनांवरुन विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असताना, काहींकडून कायद्याचा निषेध होत असताना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडेंनी या कायद्याचं जोरदार समर्थन केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही असल्याचं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. कोल्हापुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर तोफ डागली. आपला देश माणसांचा आहे. पण देशभक्तांचा नाही, हे दुर्दैव असल्याचं म्हणत संभाजी भिडेंनी कायद्याला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. स्वार्थ हाच धर्म असणारे या कायद्याला विरोध करत आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक देशवासीयाला आनंद व्हायला हवा. देशभक्त असणारा प्रत्येक जण या कायद्याला पाठिंबा देईल. या कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत, असं संभाजी भिडे म्हणाले. शिवसेना सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणार नाही, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं. शिवसेनेच्या भूमिकेबद्दल गैरसमज निर्माण केला जात आहे. शिवसेनेकडून या कायद्याविरोधात भाष्य करण्यात आलेलं नाही. शिवसेना या कायद्याबद्दल अगदी योग्य बोलत आहे. त्यांच्या बोलण्यातील बारकावे लक्षात घ्यायला हवे. शिवसेना या कायद्याबद्दल वाईट बोलणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संभाजी भिडेंनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार टीका केली. त्या फालतू माणसाबद्दल विचार करुन देशानं आणि जनतेनं वेळ वाया घालवू नये. त्यांचा विचारसुद्धा करू नका. अशी माणसं राजकारणात आली हे देशाचं दुर्दैव आहे, अशा शब्दांत संभाजी भिडेंनी राहुल गांधींवर शरसंधान साधलं.
CAA: कायद्याला विरोध करणारे देशद्रोही; संभाजी भिडेंची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 10:16 PM