Maharashtra Politics: तू टिकली लाव. आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे, अन् आमची भारतमाता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असे विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला उद्देशून केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. संभाजी भिडे यांच्या या विधानाची दखल राज्य महिला आयोगाकडूनही घेण्यात आली होती. याप्रकरणी संभाजी भिडे यांनी खुलासा सादर केल्याचे सांगितले जात आहे.
महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधीही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत. त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा, असे सांगत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना नोटीस बजावली होती. यावर संभाजी भिडे यांच्याकडून खुलासा सादर करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
नवा वाद नको म्हणून महिला आयोग गप्प!
मिळालेल्या माहितीनुसार, महिला पत्रकाराला उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत भिडे गुरुजी यांनी अखेर महिला आयोगाकडे खुलासा पाठविल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याबाबत मौन बाळगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भिडे गुरुजींशी अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत. या खुलाशामुळे नवा वाद निर्माण होऊ नये, म्हणूनच महिला आयोग गप्प असल्याचे म्हटले जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी भिडे गुरुजी यांनी खुलासा सादर केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, शिवप्रतिष्ठाचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही एका महिला पत्रकाराला ‘आधी कुंकू लाव मग तुझाशी बोलतो’, असे म्हणत जाहीर अपमान केला. महिलेचे कर्तृत्व कुंकू लावण्याने सिद्ध होते का? तिचे काम व कुंकू याचा काय संबंध आहे? संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराचा केलेला अपमान हा समस्त महिला वर्गाचा अपमान आहे. महिलेला तुच्छ लेखणाऱ्या अहंकारी पुरुषी मानसिकतेतून आलेला हा प्रकार असून भिडे ही समाजातली विकृत्ती आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"