नांदेड – राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन(Mumbai Cruise Drugs Party) सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून येते. मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने ड्रग्सच्या मुद्द्यावरुन विरोधकांना लक्ष्य केले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाने राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे. तर मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंथ असल्याचे पुरावे समोर आणणार असा इशारा फडणवीसांनी मलिकांना दिला आहे. मात्र या सगळ्या घडामोडीत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास येत आहे.
नांदेडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे ज्यात शेतकऱ्याने बँक पीककर्ज देत नसल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेनं शेतकऱ्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर(Farmer Suicide) त्याच्या पत्नीने कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे हा शेतकरी शिवसैनिक असल्याची माहिती आहे. उत्तम कल्याणकर हे नांदेडच्या गोगदरी गावातील शेतकरी होते.
गेल्या अनेक दिवसांपासून पीककर्जासाठी बँकेच्या चक्करा माराव्या लागल्या. तरीही पीककर्ज उपलब्ध होत नाही. म्हणून हताश झालेल्या शेतकऱ्याने जीव देण्याचा निर्णय घेतला. इतकचं नाही तर शिवसैनिक असलेल्या या शेतकऱ्याने भगव्या कपड्यातच गळफास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळीच्या सणात सगळीकडे लखलख दिवे झळकत असतानाच उत्तम कल्याणकर या शेतकऱ्याच्या आत्महत्येने कुटुंबीयांवर अंधार पसरला आहे.
काय आहे प्रकरण?
नापिकी आणि कर्जबाजारी असल्याने शेतकऱ्याला बँकेकडून कर्ज देण्यास विलंब लागत होता. या शेतकऱ्याकडे अडीच एकर शेती आहे. पीककर्ज मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला. त्यानंतर मानसिक तणावाखाली येत त्याने गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. गावकऱ्यांनी आणि मृत शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी असंही म्हटलं आहे. अलीकडेच नांदेडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. नापिकी आणि बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विष प्राशन केले होते. संतोष ठोके असं या शेतकऱ्याचं नाव होतं.