मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष कालपर्यंत शिगेला पोहोचला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रपदाचा राजीनामा दिला. यानंतर अवघ्या तीन दिवसांचे फडणवीस सरकार गडगडले. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मात्र, ही आघाडी शिवसैनिकांना फारशी आवडली नसल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती झालेली असली तरीही मतदारसंघ सोडण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नव्हते. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचा तर भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. काही शिवसैनिकांनी सामुहिक राजीनामेही दिले होते. मात्र, निकालानंतर वेगळीच गणिते आकारास आली असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करत आहेत. नेमका हाच मुद्दा काही शिवसैनिकांना आवडलेला नाही. यामुळे रमेश सोळंकी नावाच्या शिवसैनिकाने मंगळवारी रात्री पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे.
सोळंकी याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाचा राजीनामा देत आहे. माझा अंतरात्मा आणि वाचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझे मत जाणून घ्यायचे होते. आता मला माझी भूमिका मांडायची आहे. जो माझ्या श्रीरामाचा नाही (काँग्रेस), तो माझ्या काही कामाचा नाही आहे. पुन्हा एकदा आदित्या ठाकरे यांचे धन्यवाद. तुमच्यासोबत काम करण्यात आनंद मिळाला.
यानंतर पुन्हा एक ट्विट करत सोळंकी यांनी म्हटले की, मी कोणत्याही पदाची किंवा तिकिटाची मागणी केलेली नाही. महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी आणि मुख्यमंत्री बनविल्याबद्दल शिवसेनेला शुभेच्छा. माझा अंतरात्मा आणि वाचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. माझे पद, माझा पक्ष आणि सहकाऱ्यांसाठी हे योग्य नाही.
असे सांगताना त्यांनी हा निर्णय घेणे खूप कठीण जात असल्याचे म्हटले आहे. जेव्हा जहाज बुडायला लागते तेव्हा पहिले उंदीर उड्या मारायला लागतात. पण मी माझा पक्ष सर्वोच्च उंचीवर असताना सोडत असल्याचेही सोळंकी यांनी म्हटले आहे.