साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा मागितल्याची चर्चा महायुतीत सुरु आहे. नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ लढण्याची शक्यता असून यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत. यावरून भुजबळांनी नाशिकच्या जागेवर अजून चर्चा सुरु आहे. बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे. शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही मी पण तुमच्यातला होतो, असे भुजबळ म्हणाले आहेत.
नाशिकच्या जागेवरून अनेकजण मुंबईला जाऊन आले आहेत. तीनही पक्ष नाशिकच्या जागेवर चर्चा करत आहेत. चर्चेनंतर कुणीही उमेदवार ठरला तर आम्ही काम करणार आहोत. भुजबळ कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्या, असे मी सांगितले नाही. फक्त शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या आम्हाला द्या अशी मी मागणी केली आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
सातारा ऐवजी नाशिक द्या अशी चर्चा आहे, मात्र महायुतीमधील नेते निर्णय घेतील. मुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्याबाबत असलेल्या एका कामासाठी मी गेलो होतो. आपल्या पक्षाला जागा मिळावी यासाठी प्रयत्न असतो. नाशिकची जागा आमच्याकडे आली तर चर्चा होईल आणि नंतर उमेदवार ठरेल, असेही भुजबळ म्हणाले.
नाशिकमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना भाजपाचा विरोध आहे. तर गोडसे पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. अशातच भाजपासाठी सातारा सोडण्यासाठी राष्ट्रवादीने नाशिकची जागा मागितली आहे. नाशिकची जागा शिंदे गटाकडे आहे. ती जागा राष्ट्रवादीला सोडली तर शिंदे गटाची अडचण होणार आहे. आधीच बारामतीवरून शिंदे गटात आणि राष्ट्रवादीत वातावरण तापलेले आहे. यामुळे मार्ग काय निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.