राहुल नार्वेकरांना लोकसभेचे तिकीट देण्यास शिवसैनिकांचा विरोध; एकनाथ शिंदेंना लिहिले शेकडो सह्यांचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 12:59 PM2024-03-16T12:59:48+5:302024-03-16T13:00:26+5:30
भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईपासून लांब ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपाला मुंबई सर करायची आहे.
ज्या राहुल नार्वेकरांनीशिवसेना कोणाची याचा निकाल दिला त्या नार्वेकरांना लोकसभेचे तिकीट देण्यास शिवसैनिकांनी विरोध केला आहे. यासाठी शेकडो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविले आहे. यामध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पूर्वी देवरांकडे असलेला हा मतदारसंघ २०१४ पासून शिवसेना जिंकतेय. आता तर देवराच शिवसेनेत आलेत, यामुळे हा मतदारसंघ भाजपाला देऊ नये, असे या पत्रात म्हटले आहे.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून लोकसभा लढविण्याची तयारी करणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या तिकीटाच्या अडचणी वाढणार आहेत. आता मुख्यमंत्री शिवसैनिकांचे ऐकतात की भाजपासोबत मतदारसंघाची तडजोड करतात, हे येणारा काळ ठरविणार आहे.
भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईपासून लांब ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपाला मुंबई सर करायची आहे. यामुळे सहापैकी चार ते पाच मतदारसंघातून भाजपाच लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे असताना राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्यासाठी तयार केले जात होते. परंतु शिवसैनिकांनी यास कडाडून विरोध केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचे तमाम हिंदुस्थानाचे स्वप्न आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते यासाठी दिवसरात्र काम करून हे स्वप्न साकार करू, पण हे करत असताना आम्ही दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार अपेक्षित आहे, असे शिवसैनिकांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या मतदारसंघात लाखोंचे मताधिक्य मिळू शकते. दक्षिण मुंबईतल्या घराघरात धनुष्यबाण पोहोचला आहे. या मतदारसंघात शिवसैनिकांच्या फौजा आहेत. आपण शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहात. आपण आमच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून आम्हाला न्याय द्याल ही अपेक्षा आहे, अशी विनंती शिंदेंना करण्यात आली आहे.