नाशिक - राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही गटात एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे. त्यात संजय राऊत संपर्कप्रमुख असलेल्या नाशिक शहरात अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर हे पदाधिकारी नसून कचरा आहे. कचरा जमा करून मुख्यमंत्री त्यांच्यासमोर भाषण करतात अशा शब्दात राऊतांनी शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर गंभीर आरोप केले.
शिंदे गटात गेलेले पदाधिकारी म्हणाले की, संजय राऊतांनी कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय? ते रोज शरद पवारांकडे जातात आणि शिवसेना कशी संपवायची याचं स्क्रिप्ट घेऊन येत रोज सकाळी १० वाजता बोलतात. ही त्यांची लायकी आहे. आम्ही शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक आहोत तुमच्यात धमक असेल तर तुम्ही कुठेही सांगा, आम्ही यायला तयार आहोत. आमच्याामागे आता शिंदेंची ताकद आहेत. तुडवातुडवी काय असते हे शिवसैनिक तुम्हाला दाखवून देतील असा इशारा त्यांनी दिला.
त्याचसोबत शिंदे गटात प्रवेश केलेल्या एका पदाधिकाऱ्याने नाशिक शिवसेना कार्यालय हे माझ्या वडिलांच्या नावावर असून भविष्यात त्या कार्यालयावर आम्ही दावा करणार असल्याचं सांगितले. घरोघरी बाळासाहेबांचे विचार पोहचवण्याचं काम आम्ही केले. एकनाथ शिंदे धडाडीने काम करतायेत तेही घराघरात पोहचवू. संजय राऊत हे केवळ शनिवार-रविवारी बडोदरा कंपनीचा हिशोब घ्यायला नाशिकला येतात. बाकी शिवसैनिक ओरिजनल कोण हे आपणांस माहिती नाही. शनिवार-रविवारी एकाच कंपनीकडे यायचे आणि पैसे घेऊन जायचे एवढेच काम तुम्ही केलंय. नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ते तुमचं स्वागत करतात. कुणी शिवसैनिक स्वागतासाठी येत नाही याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज राऊतांना आहे असा टोला पदाधिकाऱ्यांनी त्यांना लगावला.
काय म्हणाले होते संजय राऊत?जे येडेगबाळे पकडतात, पदाधिकारी म्हणून पक्षप्रवेश करून घेतात. नाशिकमधील शिवसेना जशीच्या तशी आहे. २-४ दलाल ठेकेदार तिकडे गेले असतील. जमिनीवरचा शिवसैनिक आणि शिवसेना जागेवरच आहेत. जे कुणी गेलेत त्यांची नावेही नाशिककरांना माहिती नाहीत. मला माहिती नाहीत. शिवसेना हा महावृक्ष आहे. त्या महावृक्षाखाली काही पाळापाचोळा पडलेला कचरा जमा करून घेऊन जातात अशा शब्दात संजय राऊतांनी ५० पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश केल्याबाबत खोचक प्रतिक्रिया दिली होती.