मुंबई - गेली अडीच वर्ष शिवसैनिक कसा राहिला, कसा वागला, कसं चाललं त्याचं याचा विचार कुणी केला. आता आपलं सरकार आहे. शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही. शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागू देणार नाही. शिवसैनिकांना खोट्या केसेसला सामोरं जावं लागणार नाही. जर असं काही उदाहारण तुमच्या नजरेस आले तर संबंधित अधिकारी त्या जागेवर राहणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्भित इशारा दिला आहे.
शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य माणसांचे जीवन बदललं पाहिजे. हे सरकार माझं आहे हे सर्वांना वाटलं पाहिजे अशाप्रकारे काम आपल्याला करायचं आहे. शेवटी हे शिवसैनिक बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बाळासाहेबांनी सांगायचं, दिघेसाहेबांनी सांगायचे ते आम्ही करायचो. ही परंपरा जपणारे आम्ही आहोत. जे टिंगळटवाळ्या करतात त्यांना करू द्या असं त्यांनी सांगितले.
संजय राऊतांना टोलाहे सरकार बेकायदेशीर आहे. शपथ घेतली तर घटनाबाह्य आहे असं सांगत बसलेत. सुप्रीम कोर्टानं त्यांच्या मागण्या फेटाळून लावल्या घटनापीठ बसवून सुनावणी करणार आहे. बाहेर येऊन विजय आपलाच झाला असा दिंडोरा पिटत आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. घटनेनुसार कायद्याच्या बाहेर जाता येत नाही. आपलं सरकार स्थिर आहे. १६५ मतांनी बहुमत चाचणी पार केली आहे. त्यांचे ९९ आहेत. आणखी पुढे बघा काय काय होतं. आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे. प्रगतीपथावर न्यायचं आहे. या राज्याचा विकास करण्याचं ध्येय आपण समोर ठेऊन काम करतोय. मध्यरात्रीचे २ वाजले तरी कुणाच्या चेहऱ्यावर आळस नाही, उत्साह आहे. सकाळी टीव्हीवर बघणाऱ्यांनी बघावं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
तसेच आम्ही घेतलेला निर्णय हा शिवसेनेला, शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आहे. हा निर्णय लोकांनी मान्य केला आहे. जेव्हापासून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून शेकडो लोकं पाठिंबा द्यायला येतायेत. आम्ही रक्ताचं पाणी करून, जिवाचं रान करून, कष्ट घेऊन शिवसेना वाढवली. जे बोलतात त्यांच्या अंगावर किती केसेस आहेत? आम्ही जेल भोगलीय. १०० हून अधिक केसेस अंगावर घेतल्यात असं शिंदे यांनी म्हटलं.