मुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. मात्र अद्याप युती आणि आघाड्यांची बोलणी पूर्ण झाली नाही. आघाडीच्या जागांची चर्चा सुरू असली तरी युतीत अद्याप स्वबळावर लढायचं की, एकत्र यावरच संभ्रम आहे. यामुळे मित्रपक्षही पेचात पडले आहे. मात्र बीडमध्ये युतीचा मित्रपक्ष असलेला विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामने विधानसभेसाठी निर्धार करून जोरदार तयारी सुरू केली आहे.
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार विनायक मेटे यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. पंकजा यांनी मेटे यांची बीड जिल्हा परिषदेत असलेली सर्व शक्ती क्षीण करून टाकली. अशा स्थितीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांनीही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बीडमधून उमेदवारीसाठीच मेटे यांना स्पर्धा करावी लागणार आहे. मात्र शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनुसार बीड मतदार संघातून मेटे यांनाच उमेदवारी मिळणार असून लढत क्षीरसागर यांच्याशीच होणार आहे. तशीच तयारी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मेटे यांनी प्रितम मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. राज्यात भाजपसोबत मात्र, जिल्ह्यात नाही, असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपकडून त्यांना अडचण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे क्षीरसागर यांच्या पाठिशी शिवसेनेची किती ताकद आहे, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र मागील पाच वर्षांत मेटेंनी जिल्ह्यात निर्माण केलेली ताकद यामुळे पदाधिकाऱ्यांनी 'आमच ठरलंय, वचपा काढायचाच' अशी मोहिमच सुरू केली आहे.
२०१४ विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध विनायक मेटे यांचा थोडक्यात पराभव झाला होता. याचं शल्य अजुनही बीडकरांच्या मनात आहे. परंतु, यावेळी २०१४ मधील पराभवाचा वचपा काढायचाच आहे. त्या दृष्टीनेच तयारी सुरू असल्याचे शिवसंग्रामचे बीड जिल्हा उपाध्यक्ष आनंद जाधव यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.