Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. शिंदे गटाला राज्यभरातून वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच माजी आमदार-सभापती तसेच ३५ आजी-माजी सरपंच शिंदे गटात गेल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून धक्का तंत्र चालूच आहे. नाशिकच्या मनमाडनंतर इगतपुरीत तालुक्यात शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात माजी आमदार पांडुरंग गांगड, माजी सभापती संपत काळे यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील आजी माजी ३५ सरपंच युवासेना पदाधिकारी, शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता इगतपुरी तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.
शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच शिंदे गटात
ग्रामीण भागातील अनेक शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
दरम्यान, अनेक शिवसैनिक कार्यकर्ते ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. शिवसेनेतील आमदारांपाठोपाठ खासदार अनेक नगरसेवक सरपंच शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आता संघटनात्मक पातळीवर शिवसेनेला खिंडार पडत आहे. अनेक शिवसेना पदाधिकारी युवासेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत.