Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला दिवसेंदिवस राज्यभरातून पाठिंबा वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यंतरी आजारपणामुळे आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा थांबवली होती. आता मात्र आदित्य ठाकरे पुन्हा सुरू केली आहे.
शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते पक्षाच्या निष्ठावान सैनिकांशी संवाद साधत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या याच शिवसंवाद यात्रेतील एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी शिवसैनिकांचे लक्ष भाजप कार्यालयाकडे जाताच त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप कार्यालयातही आदित्य ठाकरे यांचे चाहते उपस्थित होते की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
भाजप कार्यालयातून काढले आदित्य ठाकरेंचे फोटो
आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा काही दिवसांपूर्वी कोकणात पोहोचली. यावेळी शिवसेनेचे आमदार राजन साळवी आणि पक्षाचे नेते आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. आदित्य ठाकरे यांच्या या भाषणाला उपस्थित शिवसैनिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत होता. मात्र या भाषणावेळी आणखी एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ज्या चौकात आदित्य ठाकरे यांची सभा सुरू होती, तिथे भाजपचे कार्यालय होते. याच भाजप कार्यालयातून काही लोक आदित्य ठाकरे यांचे फोटो काढत होते. ही बाब आदित्य यांच्या लक्षात येताच त्यांनीही फोटो काढणाऱ्या लोकांकडे पाहून स्मितहास्य केले.