Aaditya Thackeray: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिंदे गटातील आमदारांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. वारंवार करण्यात येणाऱ्या पेंग्विन नावाच्या टीकेला अदित्य ठाकरेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पेंग्विन नावाचा आपल्याला अभिमान असून, विरोधकांच्या पेंग्विन टीकेमुळे जिजामाता उद्यान प्रॉफिटमध्ये आले, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
पेंग्विन नावाचा आणि त्यासाठी केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान आहे. कारण आम्ही मुंबईसाठी काम केले आहे. आम्ही रोज बदली सरकार झालो नाही, असे म्हणत राज्यात काही हिटलर शाही आली आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. राजकारण करावे पण आरोप किती खालच्या पातळीवर जाऊन करावेत आणि काय आरोप करावे, याला काही तरी मर्यादा आखणे गरजेचे आहे. विरोधकांकडून सध्या करण्यात येणारे आरोप कुणालाच न पटण्यासारखे आहेत, असे सांगत आदित्य ठाकरेंनी विरोधकांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
काही गोष्टी जनतेसमोर येणे गरजेचे आहे
काही गोष्टी जनतेसमोर येणे गरजेचे आहे. याकूब मेमनला ज्यावेळी फाशी देण्यात आली, त्यावेळी दहशतवादी म्हणून फाशी देण्यात आली. त्यानंतर त्याचे दफन मान-सन्मानाने झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ज्याप्रमाणे लादेनला समुद्रातच दफन करण्यात आले तसेच मेमनच्या बाबतीत का नाही झाले, अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली. निवडणुका जवळ आल्या की, असे मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जातात, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
दरम्यान, विकास कामांवरून कौतुकाची थाप देण्याऐवजी आदित्य ठाकरे यांनी नेहमी टीका केली. केवळ टीका करणे म्हणजे राजकारण होत नाही. आदित्य ठाकरे यांची मला कीव येते. सत्तेत असताना मी आदित्य ठाकरे यांचे ऑफिसही बघू शकलो नाही, हे माझे दुर्भाग्य आहे, या शब्दांत शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका केली.