Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला राज्यभरात मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका आणि दौरे यांवर भर देत पक्ष संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच शिंदे गटाला राज्यभरातून वाढत असलेला पाठिंबा उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे सांगितले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा निष्ठा यात्रेला सुरुवात केली असून, आता आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दापोली येथे जाहीर सभा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे १६ सप्टेंबर रोजी कोकणच्या दौऱ्यावर येणार आहेत. आदित्य ठाकरे हे रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे नेते सूर्यकांत दळवी यांनी दिली. तसेच सध्या राजकारणात उलथापालथ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचा समाचार घेण्यासाठी आणि बंडखोरीची कीड गाडण्याचे आव्हान आदित्य ठाकरे स्वीकारले असल्याचे सूर्यकांत दळवी म्हणाले.
जशास तसे उत्तर देण्यात येईल
आदित्य ठाकरे कोकणात रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून, दापोलीत आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा येणार आहे. रामदास कदम व आमदार योगेश यांनी केलेल्या गद्दारीलाही उत्तर दिले जाईल या सभेत जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशाराही दळवी यांनी यावेळी दिला. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद या मतदारसंघात मिळेल. काही महिन्यांपूर्वी मागीलवेळी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली त्याच ठिकाणी आता निष्ठा यात्रेची सभा होईल, असे दळवी यांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गट आणि शिंदे गटातील आमदारांवर टीका करताना पाहायला मिळत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही आदित्य ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह नव्या शिंदे-फडणवीस सरकावर निशाणा साधला होता.