Maharashtra Politics:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत नवे सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होताना दिसत आहे. शिंदे गटाला राज्यभरातून वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, मी देवेंद्र फडणवीस यांच्या जागी असतो, तर स्वाभिमान आणि पक्षाची प्रतिमा जपली असती, असे म्हटले आहे.
तुमच्यात हिंमत होती तर समोरून यायला पाहिजे होते. असं गद्दारांसारखे मागून पाठीत वार करायला नको होता. म्हणे आमच्या बंडाची नोंद ३३ देशांनी घेतली. पण तुमच्या बंडाची नाही, गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. महाराष्ट्रानंतर चांगलीच नोंद घेतली आहे. यांना उठाव करायचा असता, तर जागेवरच उभे राहिले असते. पण हे पळून गेले, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
आपली चूक एवढीच झाली की, आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिले
आपली चूक एवढीच झाली की, आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिले. त्यांना अपचन झाले आणि हाजमोला खायला त्यांना पलीकडे जावे लागले. हे ४० लोक गद्दारीला बंड, क्रांती समजायला लागले आहेत आणि निर्लज्जपणे सगळीकडे फिरायला लागले आहेत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्चा वळवत, मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो, तर मी माझा स्वाभिमान सांभाळला असता. मी माझ्या पक्षाची प्रतिमा सांभाळली असती. या सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरा गेलो असतो. या ४० लोकांसोबत बसलो नसतो, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.