मुंबई - राज्यसभा निवडणुकीच्या निकालानं राज्यातील राजकीय वातावरण बदलून टाकलं आहे. या निवडणुकीत भाजपाने संख्याबळ नसतानाही तिन्ही उमेदवार निवडून आणल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. अपक्ष आणि घटक पक्षाच्या मतांनी गडबड केली. महाविकास आघाडी समर्थक ९ ते १० मते भाजपाच्या पारड्यात गेल्याने शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभव सहन करावा लागला. त्यामुळे शिवसेना आता आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी सतर्क झाली आहे.
येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्यासाठी आता केवळ शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या सोबत जातील तर आमदारांना दौऱ्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. भाजपाने या निवडणुकीत ५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर अपक्ष उभे असलेले सदाभाऊ खोत यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
१५ जूनला आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी मोजकेच नेते वगळता आमदारांना दौऱ्यावर जाता येणार नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली आहे. विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे आमदार फुटण्याच्या भीतीने नेतृत्वाने सतर्कता बाळगली आहे. पुढील काही दिवस आमदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने २ उमेदवार उतरवले आहेत. ते पक्षाच्या बळावरच निवडून आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.
"'मविआ' आमदारांमध्ये नाराजी, भाजपाला फायदा होईल"सत्तारुढ पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रयत्न होता. परंतु महाविकास आघाडीत समन्वय नसल्याने ही निवडणूक लादली. आम्ही पाचवा उमेदवार उभा केला आहे. ही जागा निवडून आणू असा विश्वास आहे. सत्ताधारी पक्षाने माझ्याशी चर्चा झाली. काँग्रेसनं उमेदवार मागे घ्यावा अशी चर्चा झाली. परंतु काँग्रेसनं उमेदवार मागे न घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे ही निवडणूक होणार आहे असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडीत असमन्वय आहे. त्यामुळे या निवडणुकीत ही नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. मी चमत्कारावर विश्वास ठेवत नाही. आमचा उमेदवार निवडून येईल हा विश्वास आहे. आम्ही ६ जागा लढवायच्या की ५ जागा लढवायची ही चर्चा झाली. या चर्चेनंतर ५ जागा लढवण्याबाबत एकमत झाले. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितला. सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये नाराजी आहे. त्याचा फायदा आम्हाला होईल असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.