ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १ - गोव्यात शिवसेनेतर्फे येत्या विधानसभा निवडणूकीवेळी वीस मतदार संघ लढविले जातील. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राउत यांनी शनिवारी या वीस मतदारसंघांची नावे जाहीर केली. तसेच भारतीय भाषा सुरक्षा मंचसोबत शिवसेनेची युतीही राउत यांनी घोषित केली.
शिवसेनेच्या येथील कार्यालयात शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राउत निवडणूकीविषयी पक्षाची भूमिका आणि तयारी याबाबत माहिती दिली. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी गोवा संपर्क प्रमुख म्हणून जीवन कामत यांची निवड केली असल्याचेही यावेळी जाहिर करण्यात आले. यावेळी गोवा राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर उपस्थित होते.
राउत म्हणाले, शिवसेना यावेळी गोव्यात निवडणूक लढविण्यास सज्ज असून वीस मतदारसंघांची निवड सेनेने केली आहे. यात मांद्रे, पेडणो, शिवोली, साळगाव, कळंगुट, मये, साखळी, सांगे, प्रियोळ, फोंडा, मडकई, काणकोण, मुरगांव, शिरोडा, थिवी, कुंकळी, म्हापसा, पणजी, कुडचडे आणि सावर्डे मतदारसंघांचा समावेश असणार आहे. उर्वरीत मतदार संघातूनही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात येणार असून येणा:या काही दिवसात ते मतदारसंघ जाहिर केले जातील.
‘मातृभाषा टिकली तर मातृभूमी टिकेल’ असे शिवसेनेचे स्पष्ट मत आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंचही मातृभाषेच्या रक्षणास्तव भारतीय जनता पक्षाविरोधात निवडणूक रिंगणात उतरत आहे. आम्ही भाषा सुरक्षा मंचच्या मातृभाषा विषयक धोरणाशी सहमत आहोत. यामुळे भाभासुमला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. भाभासुमचे नेते सुभाष वेलिंगकर हे रविवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. वेलिंगकर यांच्याशी झालेल्या चर्चेत आतार्पयतची त्यांची धोरणे आणि भूमिका आम्हाला मान्य असल्याने आम्ही त्यांच्याशी युती करण्याची तयारी दाखविली आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंचने आपल्या पक्षाची स्थापना केल्यानंतर व उद्धवची ठाकरे यांच्याशी सल्लामसलत झाल्यानंतर आम्ही या युतीबाबत अंतिम निर्णय जाहिर करु, असे राउत म्हणाले.
या महिन्याच्या दुस:या आठवडय़ात उद्धव ठाकरे गोव्यात येणार असून यावेळी विविध ठिकाणी बैठका, चर्चा घेतल्या जातील. तसेच महत्वाच्या व्यक्तींना पक्षात प्रवेश दिला जाईल. शिवसेनेतर्फे पेडणो ते काणकोणर्पयत परीवर्तन यात्र सुरु करण्याचा विचार असून तशी तयारी सुरु करण्यात आली असल्याचे राउत यांनी सांगितले.
गोवेकरांना बदल हवा आहे आणि शिवसेना आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचाचा पक्ष हा यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. मगो पक्ष हा शिवसेनेप्रमाणो समविचारी होता. गोमंतकीय अस्मिता, भाषा, संस्कृती जपणारा होता. भाउसाहेबांचे धोरण त्यांचे विचार आताच्या मगो नेत्यांनी जपले पाहिजेत आणि भाभासुमला सहकार्य केले पाहिजे, असे मत राउत म्हणाले.
सुभाष वेलिंगकर यांचे कार्य हे गोव्यासाठी ऐतिहासीक ठरेल असेही राउत म्हणाले. येणा:या विधानसभेत शिवसेनेचे आमदार असतील आणि मंत्रीमंडळात मंत्रीही असतील असा विश्वास राउत यांनी व्यक्त केला. आमचे भांडण भाजपा बरोबर नसून गोव्यात ज्या पद्धतीचे सरकार सुरु आहे त्याविरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.