Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला राज्यभरात मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका आणि दौरे यांवर भर देत पक्ष संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. यातच शिंदे गटाला मिळत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरत आहे. यातच गुन्हेगारांना पाठीशी घालणारे शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. केंद्रातील मंत्री नारायण राणे हे थेट दादागिरी करत धमकी देत आहेत. शिंदे-फडणवीस यांचे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालून दादागिरी करत उघडपणे धमक्या देत फिरत असेल तर असे दादागिरी करणारे सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी आमची आणि सामान्य जनतेची मागणी असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
राज्यातील हे सरकार गुंडांचे सरकार आहे का?
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. अशा आमदाराला माझा मित्र असल्याचे म्हणत केंद्रातील मंत्री भेटत असतील आणि मुंबई व महाराष्ट्रात फिरायचे आहे ना? अशा धमक्या देत असतील तर राज्यातील हे सरकार गुंडांचे सरकार आहे का? मुंबई व महाराष्ट्र शिंदे-भाजप यांना आंदण म्हणून दिल आहे का? अशी थेट विचारणा अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री आहेत, ते जर राज्यात कायदा व सुव्यस्था राखू शकत नसतील आणि अशाप्रकारे गुंडगिरी व दादागिरी होत असेल तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा घणाघातही दानवे यांनी केला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. हल्ले करू नका नाहीतर मुंबईत चालणे, बोलणे आणि फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, असे राणे यांनी म्हटले आहे. तसेच गोळीबार झाला असता तर आवाज तरी आला असता असे म्हणत त्यांनी गोळीबाराचा आरोप फेटाळून लावला आहे.