Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर केवळ महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले नाही, तर शिवसेनेलाही मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यातच मुंबई, ठाण्यासह अन्य ठिकाणच्या महापालिका निवडणुका कधीही लागू शकतात. या निवडणुका शिवसेनेसाठी खडतर मानल्या जात आहे. भाजप आणि शिंदे गटाला तगडी टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत असून, अनेक संघटना शिवसेनेला पाठिंबा दर्शवत आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील एका नेत्याने यासंदर्भात पाठिंबा दर्शवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची जाहीर इच्छा बोलूनही दाखवली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा झाली असून लवकरच त्यांची भेट होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना या युतीला खुला पाठिंबा दर्शवला आहे.
महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी होऊ शकते
प्रकाश आंबेडकरांची स्वत:ची ताकद आहे. ही ताकद आणि शिवसेना एकत्र आल्यास महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी होऊ शकते. शिवसेनेवर जातीयवादाचा ठपका मारला जातो. पण शिवसेनेचे हिंदुत्व आणि शिवसेनेचा विचार सातत्याने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे. शिवसेनेचे हिंदुत्व मान्य आहे हीच प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वेदांता प्रकल्पाबाबत एमआयडीसीने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवर बोलताना, वेदांता प्रकल्पाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची आणि खोटी आहे. सकाळी अर्ज केला आणि संध्याकाळी माहिती समोर येते, माहिती अधिकार कायदा एवढा सुपरफास्ट कधीपासून झाला? त्यामुळे यातील माहिती बनावट आहे, असा दावा अंबादास दानवेंनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"