मुंबई - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. तसेच ४० हून अधिक आमदार शिंदेंसोबत गेल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतून अनेक नेते आणि शिवसैनिक शिंदेंना समर्थन देत आहेत. त्यातच शिवसेनेला आज अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
रामदास कदम हे गेल्या काही काळापासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांचा विधान परिषद आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळाली नव्हती. तेव्हापासून ते शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आपण अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आज त्यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्याने आता त्यांची पुढची वाटचाल काय असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र तेव्हा रामदास कदम हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत राहिले होते. त्यातच योगेश कदम यांच्या नेतृत्वात त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या गुहागर-दापोली भागातील अनेक नगरसेवकांनी हल्लीच शिंदे गटात प्रवेश केला आहे.
रामदास कदम हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी २००५ ते २००९ या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये ते पर्यावरणमंत्री होते. मात्र २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं.