केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. निवडणूक आयोगातील निकाल लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने विधान भवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. संसदेतील शिवसेनेचं कार्यालय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. हे कार्यालय शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ताब्यात आल्याने आता संजय राऊतांसह ठाकरे गटातील खासदारांना या कार्यालयात प्रवेश मिळणार नाही.
याआधी विधान भवनातील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात आलं होतं. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेच्या दिल्लीतील संसद भवतान असलेल्या कार्यालयाचा ताबा मिळवण्यातही यश मिळवले. निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची याबाबतचा निकाल सुनावल्यानंतर शिंदे गटाने आक्रमकपणे शिवसेनेची कार्यालये ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेच्या विधानभवनातील कार्यालयावर ताबा मिळवला होता. त्यानंतर आज शिंदे गटाकडून संसदेतील कार्यालयाचा ताबा घेण्यात आला आहे.
दरम्यान, विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयावर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ताबा घेतला. त्यानंतर महापालिका मुख्यालयातील तळ मजल्यावरील शिवसेना पक्ष कार्यालयसुद्धा शिंदे गटाकडून ताब्यात घेतले जाईल, या धास्तीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी मुख्यालयात धाव घेतली. त्यांनी तेथेच तळ ठोकून शिवसेना कार्यालयाबाहेर एकप्रकारे जागता पहाराच दिला.