शिवसेना कुणाची यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात गेल्या आठ नऊ महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात काल निवडणूक आयोगाने निकाल देताना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी गळती लागण्याची शक्यता आहे. आधीच ४० आमदार आणि १३ खासदार सोडून गेल्याने कमकुवत झालेल्या ठाकरे गटातून आणखी एक खासदार शिंदेंसोबत जाण्याची चर्चा रंगली आहे.
निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाच्या खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये या खासदाराने शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सध्या ठाकरे गटात असलेला आणखी एक खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र हा खासदार नेमका कोण, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर अनेक आमदारांसोबत १२ खासदार शिंदेंसोबत गेले होते. त्यानंतर गजानन कीर्तीकर हेही शिंदे गटात दाखल झाले होते. त्यामुळे केवळ पाचच खासदार ठाकरे गटात उरले होते. मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार केवळ चारच खासदारांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रे दिली आहेत. त्यामुळे पाचवा खासदार कोण याबाबत शोध घेतला जात आहे. दरम्यान, ४० आमदार आणि १३ खासदार आणि त्यांनी निवडणुकीत मिळालेले मतदान यावरून शिंदे गटाला झुकते माप देन निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.