Shivsena Balasaheb Group, Eknath Shinde: राज्यातील सत्तासंघर्ष आता खूपत तीव्र होताना दिसू लागला आहे. सोमवारपासून शिवसेना विरूद्ध बंडखोर आमदारांचा एकनाथ शिंदे गट यांच्यात संघर्ष सुरू आहे. पक्षातील सुमारे ३८ नाराज आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापना करावी अशी विनंती हे सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करत आहेत. पण, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आपला स्वतंत्र गट तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी शिंदे गट नवीन पावलं उचलताना दिसत आहे. यातीलच एक मोठं पाऊल म्हणजे शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव ठरवलं आहे. 'शिवसेना-बाळासाहेब' गट असं या गटाचं नाव असेल अशी माहिती विविध प्रसारमाध्यमांतून दिली जात आहे. गुवाहाटीच्या बैठकीनंतर हे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे गट हा बंडखोरांचा गट आहे. त्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष या गटावर टीका करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या गटाची भूमिका नीट, मुद्देसूदपणे जनतेसमोर मीडियाच्या माध्यमातून मांडण्यासाठी शिंदे गट आज प्रवक्त्यांची नेमणूक करू शकतो. शिंदे गटात सुरू असलेल्या हालचाली आणि त्यांची राजकीय भूमिका यांच्याबाबतची माहिती मीडियाच्या समोर येऊन देणे यासाठी या प्रवक्त्यांची नेमणूक केली जाणार आहे. गुवाहाटीत असलेल्या हॉटेलमध्ये शिंदे गटाची बैठक होईल आणि त्यात या प्रवक्त्याची नेमणूक केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव 'शिवसेना-बाळासाहेब' गट ठेवल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात शिंदे गटाकडून दीपक केसरकर संध्याकाळी झूम कॉलवरून पत्रकार परिषद घेत असून त्यावेळी या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल असे सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदे गटाच्या भूमिकेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कोणीही विशिष्ट व्यक्ती नाही. एकनाथ शिंदे हे माध्यमांशी फोनच्या माध्यमातून बोलतात. पण तसे न करता थेट मीडियाशी संवाद साधून आपल्या गटाची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी प्रवक्त्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमांमध्ये माहिती पोहोचवण्यासाठी सुसूत्रता यावी यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानुसार आजच बैठक घेऊन प्रवक्त्यांची नेमणूक होण्याची शक्यता आहे.