२०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथींमध्ये नवनवे अंक समोर येत आहे. ८० तासांचं सरकार, मविआचा जन्म, एकनाथ शिंदेंचं बंड आणि हल्लीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवलेल्या भूकंपामुळे राज्यातील राजकारण ढवळून गेलं आहे. मात्र या राजकीय भूकंपांची मालिका एवढ्यात थांबणार नाही अशीच चिन्हं आहेत. लवकरच राज्यामध्ये आणखी एक भूकंप घडणार असून, त्या भूकंपाचं केंद्र भाजपा ठरण्याची शक्यता आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे ह्या भाजपा सोडण्याच्या मन:स्थितीत असून, त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहेत. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही याबाबत सूचक विधान केलं आहे.
अजित पवार यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांमध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. धनंजय मुंडे भाजपाला पाठिंबा देत थेट मंत्री झाल्याने पंकजा मुंडे यांना थेट परळीमध्येच आव्हान निर्माण झालं आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता भाजपासोबत आल्याने परळीतून पुढील निवडणूक ही धनंजय मुंडे हेच लढवतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना आपल्या पारंपरिक मतदारसंघावर पाणी सोडावे लागू शकते.
त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी पुढील वाटचालीबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा रंगली आहे. त्या काँग्रेसच्या वाटेवर असून, त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचाही दावा केला जात आहे. दरम्यान, आज पत्रकार परिषदेत असा प्रश्न विचारण्यात आला असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक विधान केलं आहे. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील तर स्वागत आहे. त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली असेल तर ती चांगली बाब आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एवढेच नव्हे तर नव्याने महाराष्ट्रात पाय रोवत असलेला बीआरएसकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित करण्याची ऑफर आली होती. त्यानंतर आता मला आलेल्या ऑफरकडे मी बघणार नाही असे नाही, असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात बीडमधील बहीण-भावाच्या लढतीकडे जास्त लक्ष असते. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंंडे यांचा पराभव करत मंत्रीपद मिळविले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी वचपा काढत बहीण पंकजा यांचा पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदही मिळविले होते.