मुंबई - एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील ४० हून अधिक आमदार त्यांच्यासोबत गेले होते. तसेच लोकसभेतील १२ खासदार आणि अनेक आजी माजी नगरसेवकही त्यांच्यासोबत गेले होते. दरम्यान, आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत. त्यातच आता दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र शिंदे गटातील नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये उदय सामंत म्हणाले की, मुंबईत दादर येथे प्रति शिवसेना भवन उभारण्याची तयारी एकनाथ शिंदे करत आहेत, असा गैरसमज पसरवला जात आहे. मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य जनतेला भेटता यावे, यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे, हा आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवनाबाबत आम्हाला कालही आदर होता आणि उद्याही तो राहील, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.