मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी युतीची पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली. यावरूनच स्पष्ट होत होते की युती करताना भाजपा आणि शिवसेनेमध्ये किती तणाव होता. भाजपाने 162 मतदारसंघ घेत शिवसेनेला कमी म्हणजेच 126 मतदारसंघ दिले. त्यातही आधीचे शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ काढून घेत काँग्रेस, राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपांवरून गुऱ्हाळे सुरू होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीतर शिवसेनेचे उमेदवारही मुख्यमंत्रीच ठरवतील असे जाहीर करून टाकले होते. तर भाजपचे दुसऱ्या फळीचे नेते युती होणार नसल्याची वक्तव्ये करत होते. या आधी भाजपाने राष्ट्रवादी, काँग्रेसच्या वजनदार नेत्यांची भरती केली होती. यामुळे युती नाही झाली तर गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपला यश मिळाले त्या ठिकाणी किंवा शिवसेनेचे आमदार आहेत त्या जागांवर नेत्यांची भरती केली जात होती. वाटाघाटीत शिवसेनेला कमी जागांवर समाधान मानावे लागल्याने शिसैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
बेलापूर ऐरोली मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेल्याने नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर राजीनामे पाठवून दिले आहेत. तसेच विधानसभेचे कामही करणार नसल्याचे म्हटले आहे. ठाण्यातही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत विरोध केला आहे. मातोश्रीवर जवळपास 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आले आहेत. तर अशीच परिस्थिती भाजपामध्येही आहे.
आज मागाठाणे मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सुर्वे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास जाणारे भाजपाचे विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकरांची गाडी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडविली. तसेच प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली. दरेकरांना सुर्वे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास न जाण्याचे सांगण्यात आले. जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अशीच परिस्थिती राज्यातील अन्य मतदारसंघांमध्येही झाली आहे. या वातावरणाची बिजे गेल्या विधानसभा निवडणुकीत रोवली गेली आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत अखेरच्या क्षणी युती तोडण्याची घोषणा करण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ही घोषणा केली होती. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये दुरावा आला होता. शिवसेनेला तेव्हा 150 जागा हव्या होत्या. मात्र, शिवसेनेची फरफट शिवसैनिकांनी अनुभवली होती. यानंतर अनेक वादग्रस्त वक्तव्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांसह शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जात होती. निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेवेळी शिवसेनेचा अपमान करण्याची संधी भाजपाच्या नेत्यांनी सोडली नव्हती. राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पावरही काढून घेण्यात आली. केंद्रासह राज्यातही दुय्यम मंत्रीपदे देण्यात आली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तर फडणवीसांनी 'वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची' भाषा केली होती. शिवसेनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत होती. यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते दुखावले होते.
या वितुष्टामुळे लोकसभेलाही काही जागांवर दगाफटका करण्याचा प्रयत्न झाला होता. असा आरोप शिवसेनेच्या माजी खासदारांनी केला होता. यामुळे शह-काटशहाच्या राजकारणात ही विधानसभा निवडणूक युती करून लढविण्यात येत आहे. शिवसैनिक भाजपाच्या उमेदवाराचे काम मनाने करणार नाहीत. तसेच भाजपाचे कार्यकर्तेही शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करणार नसल्याचे चित्र प्रत्येक मतदारसंघात दिसत आहे. याचा फटका युतीला पर्यायाने शिवसेनेलाच जास्त बसण्याची शक्यता आहे.