मुंबई - शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. तशी समजादारीची भूमिका उभय पक्षांकडून घेण्यात येत आहे. असा सूचक इशारा शिवसेनेने 'सामना' या मुखपत्रातून दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भातील वक्तव्यानंतर शिवसेनेने सामनातून आपली भूमिका स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा या कोड्याचे उत्तर आधीच सुटलं असल्याचे सामनातून म्हटले आहे. उलट दानवे यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा हे कोड सोडवण्यास मदत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
राजकारणात कोणताच प्रश्न अनुत्तरीत राहात नाही. सगळे प्रश्न कालांतराने सुटतात. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्न देखील येणाऱ्या काळात सुटेल. इकडे आम्ही सांगतो की, काळजी करू नका, मुख्यमंत्री आपलेच. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, हे आपल्या कार्यकर्त्यांना सांगणे चुकीचे नाहीच. त्याचप्रमाणे दानवेचं आहे. ते भाजपचे दिलखुलास नेते आहेत. औरंगाबादेत मुख्यमंत्रीपदावरून त्यांना छेडले असता त्यांनी म्हटलं की, भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही असं कोण म्हणत. दानवे यांचे शंभर टक्के बरोबर असून त्यांच्याजागी शिवसेनेचा नेता असता तरी, हेच सांगितले असते. मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर यापुढे शिवसेनेकडूनही दानवे यांच्याप्रमाणेच उत्तर मिळणार, असल्याचे सामनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेत आधीच ठरलं आहे. मुख्यमंत्री कोणाचा या कोड्याचे उत्तर आधीच सुटले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी युतीच्या प्रकृतीस ओरखडा न लावता बोलत राहावे की, मुख्यमंत्री आमचाच बरं का ! तसं दोघांत ठरले आहे. युतीच्या विजयाचा हाच फॉर्म्युला असल्याचे सामनातून सांगण्यात आले आहे.