मुंबई - विधानसभा निवडणूक जवळ येत असून युती आणि आघाडीच्या चर्चांना वेग आला आहे. तर काहीजण एकमेकांपासून दुरावत आहेत. यात युतीचं सर्वकाही व्यवस्थित असल्याचं दिसत आहे. तर एमआयएमने साथ सोडल्यामुळे वंचित बहुजन आघाडी अंधातरी असल्याचे दिसून येत असून मेगा आउटगोइंगमुळे आघाडीची मार्गही खडतर झाला आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती निश्चित मानली जात आहे. वाटपावरून अद्याप एकमत झाले नसले तरी पुढची सत्ता युतीची असंही सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत आधीच युतीने शानदार कामगिरी केली आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी विधानसभा मतदारसंघानुसार पाहिल्यास, युतीची गोळाबेरीज २२८ पर्यंत जाते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या जागा ४३ ने अधिक आहे. हेच वर्चस्व विधानसभेला कायम ठेवण्याचा प्रयत्न युतीचा आहे.
लोकसभा निवडणुकीत स्थापनेपासून आठ महिन्यांतच मोठी भरारी घेणाऱ्या वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ९ जागांवर पराभव पत्करावा लागला होता. यामुळे वंचित आघाडीचा आत्मविश्वास वाढला. विधानसभेलाही काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून न घेता स्वबळावर आमदार निवडून आणण्याची तयारी त्यांनी केली आहे. मात्र जागावाटप फिस्कटल्यामुळे एमआयएमने साथ सोडली. त्यामुळे वंचितचे भवितव्य आता अधांतरी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी नेत्यांच्या पक्षांतरामुळे अडचणीत सापडली आहे. राष्ट्रवादीतील ३० हून अधिक नेत्यांनी पक्षातर केले आहे. तर काँग्रेसची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. त्यातच पक्षातील अंतर्गत मतभेद बाहेर येत असल्याने अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशा सगळ्या स्थितीत देखील वंचित आणि आघाडीकडून समजदारीची भूमिका घेतली जात ण्यात येत नाही. त्यामुळे 'युतीचं सर्वकाही ऑल इज वेल' असून वंचित बहुजन आघाडी अन् आघाडीचे पाय आणखीच खोलात दिसून येत आहेत.