मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीनंतरचा पहिला अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शिवसेना आणि भाजपामध्ये सामना रंगला आहे. फुगीर आकडे दाखवण्यापेक्षा वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हानच भाजपाने दिले आहे. तर सागरी मार्ग आणि गारगाई जल प्रकल्प असे काही प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्या परवानगीसाठी लटकले असताना त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात विनाकारण तरतूद दाखवू नका, अशी सूचना करत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होत असतो. मात्र या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने अर्थसंकल्प महिनाभर लांबणीवर पडला. सन २०१७-२०१८ या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त अजय मेहता २९ मार्चला स्थायी समिती अध्यक्षांना सादर करणार आहेत. शिवसेना-भाजपाची युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या सत्तेतील हा पहिला अर्थसंकल्प ठरणार आहे. त्यामुळे भाजपाने अर्थसंकल्प जाहीर होण्याआधीच शिवसेनेवर निशाणा साधला आहे.केंद्र आणि राज्य सरकारचे अर्थसंकल्प हे समाजातील मध्यमवर्गीय आणि उपेक्षित वर्गाला दिलासा देणारे आहेत. त्यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता आगामी अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांच्या खिशात हात न घालता, कोणत्याही प्रकारची करवाढ न करता दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी आयुक्तांची भेट घेऊन केली. तर महापौरांनी आयुक्तांना पत्र पाठवून कोस्टल रोड, गारगाई जलप्रकल्प यासारख्या प्रकल्पांना अर्थसंकल्पात मांडून आकडे फुगवू नका असे सुनावले आहे. (प्रतिनिधी)
शिवसेना-भाजपात अर्थसंकल्पाचा ‘सामना’
By admin | Published: March 25, 2017 1:52 AM