मुंबई : शिवसेना-भाजपा या मित्रपक्षांमध्ये रंगलेल्या वादाला फोडणी देण्याचे काम मनसेने सुरू केले आहे़ पालिका रुग्णालयांमध्ये ६० टक्के रुग्ण राज्याबाहेरचे असल्याने त्यांच्या उपचाराची जबाबदारी केंद्र अथवा संबंधित राज्याने उचलण्याची मागणी मनसेने अर्थसंकल्पीय भाषणातून केली आहे़ याविषयी एकमत असले तरी केंद्रात भाजपा सरकार असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे़सन २०१५-२०१६ या अर्थसंकल्पावर स्थायी समितीत चर्चा सुरू आहे़ या वेळी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी रुग्णालयावरील वाढता ताण याविषयी चिंता व्यक्त केली़ पालिका रुग्णालयांत बहुतांशी रुग्ण हे मुंबईबाहेरचे किंबहुना राज्याबाहेरील आहेत़ मात्र त्यांच्या उपचारासाठी येणारा खर्च पालिकेच्या तिजोरीतून भागविण्यात येतो, असे त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून सांगितले. हीच भूमिका सेनेच्या काही नगरसेवकांनी यापूर्वी व्यक्त केली. मात्र मित्रपक्षाविरोधात आत्तापर्यंत शिवसेनेने भूमिका घेतली नव्हती़ परंतु उभय पक्षांत धुसफूस वाढत असल्याने या वादाला मनसेने दिलेली ही फोडणीच ठरण्याची चिन्हे आहेत़ (प्रतिनिधी)
शिवसेना-भाजपा वादात मनसेची फोडणी
By admin | Published: February 25, 2015 2:35 AM