ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. ७ - डंम्पर आंदोलकांचे प्रश्न सोडवण्याची कुवत शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये नाही. उलट जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांकडून मारहाण झाल्यानंतर शिवसेना-भाजपचे नेते जखमी कार्यकर्त्यांना त्याच अवस्थेत सोडून मुंबईत निघून गेले असा आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सोमवारी केला.
कणकवलीचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांना १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्यानंतर यापुढे आंदोलनाची जबाबदारी आपण घेणार असल्याचे रविवारी नारायण राणे यांनी जाहीर केले होते. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात डंम्पर चालक-मालकांना मारहाण झाल्यानंतर मुंबईत निघून गेलेल्या शिवसेना नेत्यांनी दोन दिवसात आपण एसपी आणि जिल्हाधिका-यांची बदली करु असा दावा केला होता.
पण दोन दिवसात ते काही करु शकले नाहीत अशी टीका नारायण राणे यांनी केली. आंदोलनाला हिंसक वळण देण्यासाठी नितेश राणे यांना जबाबदार धरण्यात येत आहे त्यापार्श्वभूमीवर नारायण राणे म्हणाले की, नितेश राणे यांच्याकडे डंम्पर चालकांनी जिल्हाधिका-यांशी भेट घडवून आणण्याची विनंती केली होती त्यामुळे ते या आंदोलनात सहभागी झाले असे सांगितले.
डंम्पर आंदोलन प्रकरणात अटक झालेले काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राणे यांच्यासह ३८ कार्यकर्त्यांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे. काँग्रेसतर्फे डंम्पर आंदोलन ९ मार्चपर्यंत चालू ठेवणार असल्याचे राणे यांनी सांगितले.