ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - शिवसेना - भाजपामध्ये फक्त गुरगुरणे होत नाही, सामान्यांचे महागाईसारखे प्रश्नही निकाली काढले जातात असे सांगत शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी १२० रुपये किलो दराने डाळ विकण्याचे आदेश दिल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर भाजपाच्या प्रयत्नांमुळेच डाळीचे दर कमी झाल्याचे भाजपा नेेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
डाळीचे दर गगनाला भिडले असून ऐन दिवाळी डाळ रडवणार अशी चिन्हेही होती. पण राज्य सरकार १२० रुपयांत डाळ विकणार असल्याची माहिती शिवसेनेने दिली होती. तर बुधवारी रात्री उशीरा राज्य सरकारने १०० रुपये प्रति किलो या दराने डाळ विकणार असल्याचे जाहीर केले होते. आता डाळीच्या किंमतीवरुन भाजपा - शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचे म्हणणे ऐकले व तूरडाळ १२० रुपये किलो दराने विकण्याचे आदेश दिले. त्यामुळे दिवाळीत जनतेला दिलासा मिळेल असे उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. शिवसेना व भाजपामध्ये फक्त गुरगुरणे होत नाही, तर सामान्यांचे महागाईसारखे प्रश्नही निकाली लावले जातात हे विरोधकांनी लक्षात घ्यावे असेही त्यांनी सुनावले आहे. सहिष्णू हिंदूंना बदमान करण्याचा डाव काँग्रेस व अन्य लोकं खेळत आहेत, पण हा डाव त्यांच्यावरच उलटेल असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.